आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाणीसह अॅट्रॉसिटीचेही कलम:कथित धर्मांतरप्रकरणी तरुणीसह पाच जणांवर अखेर गुन्हे दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमसंबंध बिघडल्यानंतर तरुणीने पैसे उकळून माझे बळजबरीने धर्मांतर केल्याचा आरोप दीपक रामदास सोनवणे (२६, रा. नाईकनगर) याने केला होता. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून संबंधित तरुणी नसरीनसह (नाव बदललेले) पाच जणांवर धार्मिक भावना दुखावणे, मारहाण करण्यासह अपहरण व अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर कलमान्वये क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी दीपकच्या तक्रारीत तथ्य नसून द्वेषातून आरोप केल्याचा अहवाल पाठवला होता. मात्र भाजपने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री १० वाजता दीपकचा जबाब वकिलांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आला. त्याने एफआयआरमध्ये घटनाक्रम नमूद केला. दीड महिन्यापासून हे प्रकरण गाजत आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही दीपकने मारहाणीचे आरोप केले आहेत. कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी खासदार अमर साबळे या भाजप नेत्यांनी या वादात उडी घेत पाेलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, नसरीनच्या तक्रारीवरून यापूर्वी दीपकवर बलात्कार व विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला अटकही झाली होती. आता मुलीच्या कुटुंबीयांवर दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे हे करणार आहेत.

दीपकने दिलेली फिर्याद : }२०१४ ते २०२२ दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकताना माझी नसरीनची ओळख झाली. नंतर प्रेमात रूपांतर. } लग्नाचे आमिष दाखवून नसरीनने ११ लाख उकळले. इस्लाम कबूल करून नमाज पठण, कुराण वाचण्यासाठी तगादा लावला. मी हा प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी समजूत काढली. } मार्च २०२१ मध्ये तिचे आई, वडील, काकांनी गुलमंडीत बोलावून नारेगावला नेले. बंद खोलीत विवस्त्र करून मारहाण केली. त्यानंतर इस्लाम कबूल करण्यासाठी धमकावले. } सिटी चौक पोलिस ठाण्यामागील एका दवाखान्यात खतना केली. } मी घाबरल्याने वाच्यता केली नाही. त्यांनी २५ लाखांची मागणी केली, पण ती अमान्य केल्याने माझ्यावर बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल केले. } आरोपींनी वारंवार मला जातिवाचक शिवीगाळ, मारहाण केली. अपहरण, जिवे मारण्याची धमकी दिली. नसरीनने बलात्काराची तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवत धर्मांतर व लग्नाची मागणी केली. माझ्याकडून तडजोडीचा बाँड लिहून घेतला. माझ्या बहिणीच्या लग्नाचे १.३० लाख बळजबरीने काढून घेतले.

झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवले : २ ऑगस्ट २०२२ रोजी क्लाऊड कॅम्पस येथे नेऊन धर्मांतरासाठी धमकावले. १२ ऑगस्ट रोजी मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून नमाज पठण करायला सांगितले. मी विरोध केला तर जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली, असेही दीपकने फिर्यादीत म्हटले आहे.

खासदारांवर आरोप, पण अजून पुरावे नाहीत खासदार इम्तियाज यांच्याकडून मारहाण झाल्याचे दावे दीपक, भाजप नेते करत आहेत. पण एफआयआरमध्ये तसा उल्लेख नाही. याबाबत दीपककडे विचारणा केली असता खासदारांच्या उपस्थितीत गुंडांनी मारहाण केल्याचे पुरवणी जबाबात पोलिसांना सांगितल्याचे त्याने म्हटले. पण त्याचा पुरावाही तो देऊ शकला नाही. ‘दिव्य मराठी’ने दीपक व पोलिस अधिकाऱ्यांकडे या आरोपाची खातरजमा करण्यासाठी विचारणा केली, पण पोलिसांनी बोलणे टाळले. दीपकनेही ठोस उत्तर दिले नाही.

बातम्या आणखी आहेत...