आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराणेशाही:मुख्यमंत्र्यांच्या सभेतून रोहयो मंत्री संदीपान भुमरेंनी साधले मुलाला तालुक्याचा नेता करण्याचे लक्ष्य

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास हे जिल्हा परिषदेच्या राजकारणापुरते मर्यादित होते. पण सोमवारी (१२ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत विलास यांचा ज्या पद्धतीने वावर होता, ते पाहता त्यांची पुढील वाटचाल लक्षात येत होती. या सभेसाठी गर्दी जमवण्याच्या आयोजन, नियोजनापासून ते तालुक्याचे प्रश्न मांडेपर्यंतची सूत्रे विलास भुमरे यांच्याकडेच होती. त्यातून रोहयोमंत्र्यांनी मुलाला तालुक्याचा नेता करण्याचे लक्ष्य साधले, असे स्पष्ट दिसून आले.

राज्यातील सत्तांतरात भुमरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. हिंदुत्ववादी मतांपासून फारकत घेणारे उद्धव ठाकरे यांचे सरकार नको, असे सर्वात आधी त्यांनीच एकनाथ शिंदे यांना म्हटले. एवढेच नव्हे तर त्यासाठी आमदारांना गोळा करण्यात पुढाकारही घेतला. असे खुद्द शिंदे यांनी सांगितले. त्यात कितपत तथ्य आहे, याचे उत्तर लगेच मिळणार नाही. पण भुमरे यांनी बंडात सहभागी होण्यासाठी शिंदेंना एक प्रमुख अट घातली होती. मुलगा विलासला पैठण तालुक्याचा नेता म्हणून पायाभरणी करण्याची ती अट होती, अशी जोरदार चर्चा होती. ती खरी असल्याचे आजच्या सभेत दिसून आले.

कारण औरंगाबाद ते पैठण रस्त्यावर फक्त विलास यांचेच जाहिरात फलक होते. पैठण तालुक्याच्या कोणत्या गावातून किती लोक येऊ शकतात. त्यांच्यासाठी कुठून वाहने उपलब्ध करून देता येतील. त्यांना सभास्थळी कोण आणेल, हे सारे आयोजन विलास यांनीच केले. सूत्रांनी सांगितले की, सभेचा मंडप किती आकाराचा असावा. मंचावर किती खुर्च्या असतील, हेही त्यांनीच ठरवले.

सर्वात महत्वाचे म्हणजे पैठण तालुक्यासमोरील सर्व प्रश्न त्यांनी प्रास्ताविकात मांडले. बोलण्याची त्यांनी चांगली तयारी केली होती, असे त्यातून जाणवले. एकूणात मुलाला जिल्हा परिषदेच्या राजकारणापलिकडे पैठण तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेला तरुण नेता असे दाखवून देण्याचे लक्ष्य रोहयोमंत्र्यांनी बऱ्यापैकी गाठले.

एकनाथ शिंदेंनी सभा संपल्यावर मंत्रिपुत्राच्या पाठीवर दिली शाबासकीची थाप पण प्रश्नांवर ठोस आश्वासन मिळालेच नाही. सूत्रसंचालक अर्जुन खोतकर यांनी आधी भुमरेसाहेब प्रास्ताविक करतील, असे म्हटले. लगेच त्यात विलास भुमरे अशी दुरुस्तीही केली. विलास यांनी पैठण तालुक्याचे प्रश्न मांडले. पण त्यापैकी एकावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. सर्व कामे मार्गी लावू, असे ते मोघमपणे बोलले. अपेक्षित आक्रमक पवित्रा दिसत नसल्याने शिंदेंचे भाषण सुरू असताना अखेरच्या पाच मिनिटांत अनेक लोक उठून गेले.

शिवसेनाप्रमुखांच्या सभेसारखी गर्दी

२० जानेवारी १९९४ रोजी पैठणला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली. त्या सभेसारखी गर्दी जमवण्याचे टार्गेट ठेवल्याचे शनिवारी रोहयोमंत्र्यांनी सांगितले होते. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाल्याचे दिसले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभेनंतर विलास यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.

बातम्या आणखी आहेत...