आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्येची त्रिशतकाकडे वाटचाल सुरू झाली असून शुक्रवारी (दि.3 जुलै) रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या असून शासकीय कार्यालयातून कर्मचाऱ्यांचे अप डाऊन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपूर्वी आटोक्यात आली असताना पुन्हा जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे मोठ्या शहरातून आलेल्या व्यक्तींना कोरोना ची लागण होऊ लागल्याचे चित्र आहे. मात्र महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या सतर्कतेने बाहेरगावाहून आलेल्या गावकऱ्यांना थेट विलगीकरण कक्षात पाठवले जात असल्याने सामाजिक संक्रमणाचा धोका काही प्रमाणात कमी झाला आहे.
दरम्यान हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी (दि.3 जुलै) तब्बल बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. यामध्ये हिंगोली शहरातून दोघांचा समावेश असून हे दोघेही जण हैदराबाद येथून परत आले होते. तसेच कळमनुरी तालुक्यातील पाच जणांचा समावेश असून त्यात दोघेजण कळमनुरी येथील असून ते औरंगाबाद येथून आले होते. तर तिघे जण कळमनुरी तालुक्यातील नवीचिखली या गावातील आहेत हे तिघेही मुंबई येथून आले आहेत.
याशिवाय वसमत येथील चौघांचा समावेश असून हे चौघेजण कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील होते. तर सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रूक येथील एका 25 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान सध्या स्थिती हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 289 झाली आहे. त्यापैकी 248 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असून सध्याच्या स्थितीत 41 रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
हिंगोली शहरातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये परभणी येथून ये-जा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तातडीने आदेश काढून जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे अपडाऊन यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.