आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी सुरू:पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये 25 हजार कुटुंबांना पाइपलाइनद्वारे मिळणार गॅस

औरंगाबाद / सतीश वैराळकर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाग गॅस सिलिंडर वापरणाऱ्या शहरवासीयांसाठी आता आनंदाची बातमी आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत भूमिगत गॅस पाइपलाइनद्वारे २५ हजार कुटुंबांना जोडणी मिळणार आहे. पुढील वर्षाच्या दिवाळीपर्यंत एक लाख कुटुंबांना गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गारखेडा, ज्योतीनगर, दशमेशनगर, बन्सीलालनगर आणि वेदांतनगरात काम सुरू झाले आहे. अंतर्गत जोडण्यांचे काम अनेक वसाहतींमध्ये पूर्ण झाले आहे. तूर्तास मुख्य रस्ता व सोसायटीच्या आतील बाजूंचे काम सुरू आहे. मुख्य पाइपलाइन टाकण्यास सुरुवात झालेली नाही. नागरिकांना सिलिंडर अथवा पाइपलाइनमधून येणारा गॅस या दोन्हीपैकी कुठलीही एक सुविधा वापरता येईल. तूर्तास केवळ स्वयंपाकासाठी हा गॅस मिळेल. गिझरसाठीची सुविधा ऑनलाइन प्रक्रियेनंतर सुरू होऊ शकते.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून भूमिगत पाइपलाइनद्वारे गॅस आणण्याच्या ३५०० कोटींच्या या योजनेचा शुभारंभ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम बंद पडले होते. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर मनपाने भारत पेट्रोलियमकडे २८ कोटी भरले असून पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात गारखेडा, एन-५, ज्योतीनगर, दशमेशनगर, बन्सीलालनगर आणि वेदांतनगरमध्ये अर्ज भरून घेणे सुरू आहे. सात कंत्राटदारांद्वारे अंतर्गत काम सुरू आहे. नगर, शिर्डी, संगमनेर आणि औरंगाबाद या चार ठिकाणी ४ लाख नागरिकांना याद्वारे गॅसचा पुरवठा केला जाईल.

ठरलेल्या वेळेत गॅस देऊ गॅस पाइपलाइनमुळे रस्ते खोदल्यास डागडुजीसाठी ३०० कोटी लागतील असे पत्र मनपाने गॅस कंपनीला दिले. त्यानंतर २० कोटी रुपये भरून दोन प्रभागात काम सुरू झाले. त्यानंतर मनपाने पैसे भरण्याचा आग्रह धरल्यानंतर काही महिने हे काम बंद होते. आता केंद्र आणि राज्यात आमचे सरकार आहे. त्यामुळे शहरवासीयांना ठरलेल्या वेळेत पाइपलाइन गॅस उपलब्ध करून देऊ असे मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर ७ आणि ९ या दोन वॉर्ड कार्यालयांच्या क्षेत्रात २२० किमी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.

घरापर्यंत जोडणी मोफत मिळेल सिडको एन-३ व ४ भागातील विविध सोसायट्यांमध्ये कंपनीच्या वतीने अर्ज भरून घेतले जात आहेत. घरापर्यंत गॅस जोडणी मोफत िमळेल. संबंधितांकडून गॅस क्रमांक, आधार कार्ड आणि वास्तव्याचा पुरावा घेतला जातोय. यासाठी फी आकारली जात नाही. एन-३ येथील वसाहतीत पाइपलाइनसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत-देशमुख यांनी केले.

दोन हजार किलोमीटरची पाइपलाइन शहरात दोन हजार किलोमीटरची गॅस पाइपलाइन टाकली जाईल. देशपांडे अँड पाटील असोसिएट या संस्थेची पीएमसी म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीगोंदा ते औरंगाबाद हे अंतर २०० किमीचे आहे. त्यापैकी ८० किमी पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. वाळूज एमआयडीसीत १४० किमीची लाइन टाकून सर्व कंपन्यांना गॅस पुरवला जाईल. मुख्य गॅस पाइपलाइन २४ इंचाची, तर शहरातील पाइपचा आकार ६० ते १२५ मिलिमीटरचा राहील. वसाहतींची गरज लक्षात घेऊन त्या त्या व्यासाचे पाइप टाकले जातील.

दिवाळीपर्यंत एक लाख जोडण्या देणार प्रायोगिक तत्त्वावर २५ हजार जोडण्या देण्यात येतील. त्यासाठी सुरक्षित अशा वसाहतींची निवड केली आहे. दिवाळीपर्यंत एक लाख कुटुंबीयांना जोडण्या दिल्या जातील. प्रतापनगर, सिडकोतील काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गळती झाली तरी गॅस हवेत उडून जातो सिलिंडरद्वारे पुरवला जाणारा गॅस एलपीजी असून तो अति संवेदनशील आहे. पाइपलाइनद्वारे पीएनजीचा (पाईपड् नॅचरल गॅस) पुरवठा केला जाणार आहे. या गॅसला गळती लागली तरी तो हवेत उडून जातो. यामुळे धोका नाही. सिलिंडरचा गॅस ७५ रुपये किलो तर पाइपलाइनचा गॅस ४० रुपये किलोप्रमाणे मिळेल.

बातम्या आणखी आहेत...