आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी ता. २५ हंगामी वसतीगृहावरून शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. वसतीगृहे का सुरु नाहीत या प्रश्नावर सोनटक्के निरुत्तर झाले. तर क्रीडा संकुल, रोहित्र वाटप, सौरपंपाचा विषय देखील चांगलाच गाजला.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार ॲड. राजीव सातव, हेमंत पाटील, आमदार विप्लव बाजोरीया, तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजेश नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनी हंगामी वसतीगृहाचा मुद्दा मांडला. मागील वर्षी मजूरांच्या स्थलांतरानंतरही एकही वसतीगृह का सुरु झाले नाही याची विचारणा त्यांनी केली. यावेळी खासदार ॲड. सातव यांनीही या संदर्भात शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याकडे विचारणा केली, मात्र त्यांना योग्य उत्तर देता आले नाही. तसेच शिष्यवृत्ती वाटपाबाबत तक्रारी आल्याची कबुली सोनटक्के यांनी दिली.यावरूनही त्यांना चांगलेच धारेवर धरले.
जिल्हा क्रीडा संकुलावर कोट्यावधींचा खर्च होत असतांना किती खेळाडू घडले असा प्रश्न आमदार बांगर यांनी उपस्थित केला. मात्र क्रीडाधिकाऱ्यांना त्याची माहितीच देता आली नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अनुदान वाटपामध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप डॉ. पाचपुते यांनी केला. पुरजळ २३ गाव पाणी पुरवठा योजनेच्या देयकावरून जिल्हा परिषद सदस्य अंकूश आहेर यांनी विज कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. देयक भरल्यानंतरही विज पुरवठा का सुरु केला नाही याप्रश्नावर आम्ही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगत विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हातवर केले. तर यावेळी जळालेले रोहित्र तातडीने बदलून देण्याच्या सुचना आमदार बांगर यांनी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनंदनचा ठराव
कोविडमध्ये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उकृष्ट काम केले. काँन्टॅक्ट, ट्रेसींग अन ट्रीटमेंट या पातळीवर जिल्हयाने काम केल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाल्याचे सांगत लोकप्रतिधींनी जयवंशी यांच्या कामाचे कौतूक करून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.