आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘आलो नाथा तुझ्या घरी, भानुदास एकनाथ नाममुखी, ठेव आनंदी सदा’असे म्हणत नाथषष्ठीनिमित्त पैठणनगरीत संत एकनाथांच्या चरणी नतमस्तक हाेण्यासाठी रविवारी पाचशेहून अधिक दिंड्या दाखल झाल्या. या राज्यभरातील दिंड्यांच्या माध्यमातून नाथषष्ठीच्या मुख्य साेहळ्याच्या पूर्वसंध्येला दाेन लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.
रविवारी पहाटेपासूनच नाथ समाधी वाड्यातील नाथ महाराजांच्या दर्शनासाठी वारकरी पैठणनगरीत दाखल हाेण्यास सुरुवात झाली. पंढरपूरच्या यात्रेनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून पैठणची यात्रा प्रसिद्ध आहे. राज्यातील विविध भागांतून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दिंड्या दाखल झाल्या. गोदावरीचे वाळवंट, प्रतिष्ठान काॅलेज परिसर, विविध मठ, उद्यान परिसर, नागघाट, धरण परिसरातील संतपीठ, पैठणी साडी केंद्र येथे दिंड्या विसावल्या. यंदा पाच लाख भाविक सोहळ्यासाठी येतील, असे नाथ वंशज योगिराज महाराज गोसावी यांनी सांगितले. संत एकनाथ महाराजांच्या नाथ वाड्यातील पवित्र रांजण शनिवारी रात्री प्रशिद गोसावी यांच्या कावडीने भरला. तुकाराम बीजेपासून हा रांजण भरण्यास सुरुवात झाली हाेती.
मंदिरासह परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे : नाथ समाधी मंदिर व परिसरात यंदा नगर परिषदेने ४०, तर १६ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे नाथ संस्थानच्या वतीने लावण्यात आले आहेत. वारकऱ्यांना सहज दर्शन घेता यावे असे नियोजन नाथ संस्थानच्या वतीने करण्यात आल्याचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांनी सांगितले. मानाच्या दिंड्यांची आज मिरवणूक : संत एकनाथ महाराजांच्या वाड्यापासून सोमवारी दुपारी १२ वाजता नाथवंशजांची पहिली मानाची दिंडी मिरवणूक निघेल. यात राज्यातील काही मानाच्या दिंड्यांचा सहभाग असेल, असे नाथवंशज योगिराज महाराज गोसावी यांनी सांगितले.
न.प.तर्फे३०० मोबाइल शौचालये नगर परिषदेच्या वतीने ३०० मोबाइल शौचालये, १०० कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त ५० कर्मचारी नियाेजनासाठी आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर विभागाच्या १२० बस, जालना ३०, नगर आगराच्या ५० बस यात्रेदरम्यान सोडल्या जाणार आहेत. गोदावरीच्या वाळवंटात नळाच्या माध्यमातून पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
५० ते ६० कोटींची उलाढाल अपेक्षित यात्रेत पाचशेहून लहान-मोठी विविध साहित्यांची दुकाने थाटली असून यात्राेत्सवादरम्यान ५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांनी सांगितले. या यात्रेमुळे मंदावलेल्या बाजारपेठेत उत्साह निर्माण होणार असल्याने स्थानिक बाजारपेठेत व व्यापारी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.