आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅनॉट प्लेसमधील व्यापाऱ्यांनी मनपाच्या पार्किंग पॉलिसीला विरोध दर्शविला होता. आता मनपा प्रशासकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पार्किंग पॉलिसी राबवण्यास त्यांनी संमती दिली आहे. कॅनॉटमध्ये पहिला एक तास पार्किंग मोफत असेल. त्यानंतर दुचाकीसाठी १०, तर चारचाकीसाठी ३० रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय व्यापाऱ्यांच्या वाहनांचीही नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ३०० वाहनांची नोंद केली आहे. व्यापाऱ्यांनी ‘पे अँड पार्क’मध्ये गाडी उभी करण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. कॅनॉटमध्ये ५२ ठिकाणी पार्किंगची सोय असून, त्यातील १७ ठिकाणी मोफत पार्किंग असेल.
सध्या कॅनॉटबरोबर अदालत रोड आणि निराला बाजार येथेदेखील ‘पे अँड पार्क’ व्यवस्था सुरू केली आहे. महिनाभरात उस्मानपुरा, सूतगिरणी, पुढच्या टप्प्यात पुंडलिकनगर आणि टीव्ही सेंटर येथे ही सोय सुरू करण्यात येणार आहे.
सर्व ठिकाणी नियम सारखेच नसतील
कॅनॉट प्लेस बाजारपेठ आहे म्हणून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची वाहने आणि पहिला तास मोफत असा निर्णय घेण्यात आला आहे. निराला बाजार, टीव्ही सेंटर या बाजारपेठांसाठी हे नियम लागू होऊ शकतात. मात्र, इतर ठिकाणी महापालिका प्रशासकाच्या आदेशानुसार नियम लागू करण्यात येतील. - स्नेहलचंद्र सलगरकर, संचालक, कर्बलेट
पहिला तास मोफत, नंतर द्यावे लागेल शुल्क
फक्त कॅनॉटसाठी सध्या पहिला तास मोफत, असा नियम करण्यात आला आहे. त्यानंतर दुचाकीला प्रतितास १० रुपये आणि चारचाकीसाठी प्रतितास ३० रुपये दर असेल. मात्र अगोदरच पूर्ण दिवसाची किंवा अधिक तासांची बुकिंग केल्यास सवलत देण्यात येईल, असे मनपाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने सांगितले.
भविष्यात ५ हजारांवर वाहनतळ उभारणार
पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सिडको कॅनॉट प्लेस, निराला बाजार, उस्मानपुरा, अदालत रोड, सूतगिरणी चौक, पुंडलिकनगर, टीव्ही सेंटर या सात ठिकाणी दोन महिन्यांत पार्किंग सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर ही सेवा सुरू केली जाणार आहे. भविष्यात पाच हजारांपेक्षा अधिक वाहनतळ सुरू करण्यात येईल, असे कंत्राटदाराने सांगितले. यात सर्वात छोटी पार्किंग व्यवस्था पाच दुचाकींसाठी असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.