आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गाची उभारणी:3 वर्षे दिवसरात्र राबले 23 हजार लोक, नागपूर-शिर्डी 520 किमी मार्गाचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नामदेव खेडकर | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस-वेचे अर्थात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे होत आहे. महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमी पहिला टप्पा पूर्ण झाला असून भविष्यात रोजगारासह व्यवसायवृद्धीला यामुळे चालना िमळेल. या ५२० किमी मार्गाची उभारणी ११ कंत्राटदार कंपन्यांनी ३ वर्षांत केली. या काळात अभियंते आणि मजुरांचा विचार करता रोज २२ हजार ९४६ लोक कामावर राबले. एकाच कामावर एक दिवसात इतके मनुष्यबळ वापरलेला राज्यातील हा एकमेव प्रकल्प ठरला. एप्रिल २०१९ मध्ये समृद्धी महामार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले होते. १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत नागपूर ते शिर्डीपर्यंत एकूण ११ पॅकेजेसचे काम ९५ टक्के पूर्ण झाले. ऑगस्ट महिन्यापासून या रस्त्यावरील सुशोभिकरण व अन्य किरकोळ कामे सुरू होती. मागील तीन वर्षांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत एक महिना आणि दुसऱ्या लाटेत दोन महिने हे काम पूर्णपणे बंद होते. लाट ओसरताच काम जोमाने सुरू झाले आणि आता शिर्डीपर्यंत पूर्णही झाले आहे.

९५ टक्के कामगार महाराष्ट्राच्या बाहेरील : महामार्गाच्या कंत्राटदारांकडे अभियंत्यांपासून अकुशल मजुरांपर्यंतचे जवळपास ९५ टक्के लोक छत्तीसगड, ओरिसा, बिहार, प. बंगाल व झारखंडमधील होते. सिव्हील वर्कलाईनमध्ये महाराष्ट्रातील अभियंते व अकुशल कामगारांऐवजी बाहेर राज्यातील मजूर आणि अभियंते नेमण्यात आले होते.

तीन शिफ्टमध्ये दिवसरात्र काम : एमएसआरडीसीचे औरंगाबाद-बुलढाणा पॅकेजची जबाबदारी असलेले एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे यांनी सांगितले, हा रस्ता पूर्णपणे ग्रीनफिल्ड असल्याने कुठलेही अडथळे नव्हते. २४ तास तीन शिफ्टमध्ये काम होई. दिवसापेक्षा रात्री कामाचा वेग अधिक असायचा.

कर्मचाऱ्यांसाठी चोख व्यवस्था, अपघातांबाबतही सर्वतोपरी दक्षता काम सुरू असताना प्रत्येक कंत्राटदार कंपनीने रस्त्यालगत जागा भाडोत्री घेऊन छावण्या (कॅम्प) तयार केल्या होत्या. या छावण्यांमध्ये २ हजार ते २२०० कुशल, अकुशल कामगारांची व्यवस्था होती. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या कामगारांसाठी कॅम्पमध्येच विलगीकरण कक्ष स्थापण्यात आले होते.

या रस्त्याची बांधणी १५० किमी प्रतितास दर्जाची आहे. मात्र, केंद्राच्या नियमानुसार ताशी १२० िकमी वेगमर्यादा ठेवली आहे. १२० च्या वेगाने धावणाऱ्या वाहनाचा अपघात गंभीर स्वरूपाचा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी क्विक रिस्पॉन्स व्हेइकलची सोय करण्यात आली आहे. या व्हेइकल अपघातस्थळी अवघ्या ५ ते ७ मिनिटांत पोहोचू शकतील. पहिल्या अर्ध्या तासात रुग्णालयापर्यंत पोहोचता येईल.

वर्धा जिल्ह्यात अर्वी पुलगाव येथे वेगवेगळ्या दिशांहून येणाऱ्या वाहनांना वळताना अडचण येऊ नये म्हणून अशी व्यवस्था आहे.

बातम्या आणखी आहेत...