आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकंपनीच्या कामानिमित्त शहरात आलेले धुळ्याचे विलास गुलाब पाटील (४०) यांचा सोलापूर-धुळे महामार्गावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाला. खड्ड्यात दुचाकी आदळून विलास व त्यांचा मित्र मुरलीधर पाटील रस्त्यावर फेकले गेले. मागून आलेली सुसाट कार थेट विलास यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे विलास यांच्या मृत्यूनंतर ठेकेदाराने मागील अनेक दिवसांपासून खराब झालेल्या रस्त्याची रात्री अंधारात दुरुस्ती सुरू केली.
साक्री तालुक्यातील टिटाणे गावचे रहिवासी असलेले विलास नेटसर्फ या औषधी उत्पादन कंपनीत काम करत होते. सध्या नोकरीनिमित्त ते कुटुंबासह धुळ्यात वास्तव्यास होते. शुक्रवारी कंपनीची बैठक असल्याने मित्र मुरलीधरसह ते दुचाकीने शहरात आले होते.बैठक संपल्यानंतर ते दुपारी एक वाजता सोलापूर-धुळे महामार्गावरून जात होते. मात्र, जांभाळा गावाजवळील रस्त्यावर त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून नियंत्रण सुटल्याने दोघेही रस्त्यावर पडले. तेव्हा मागून येत असलेली महिंद्रा कंपनीची एसयूव्ही (एमएच २० सीएस ७२२४) विलास यांच्या डोक्यावरून गेली.
जांभाळ्यातील ग्रामस्थांनी दौलताबाद पोलिसांना अपघाताची माहिती दिली. कर्मचारी सुनील पठाडे व संतोष धोत्रे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना घाटीत दाखल केले. मात्र, विलास गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विलास यांनी नोकरी मिळवून कुटुंबाची जबाबदारी पेलली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे वडील व लहान भावाचे निधन झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा व दहावीत शिकणारी मुलगी आहे.
अपघातानंतर ठेकेदाराने रात्रीतून बुजवले खड्डे
जांभाळा गावाजवळील रस्त्यावर अनेक महिन्यांपासून खड्डे आहेत. मागील तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाला. दिलीप बिटकॉनकडे या रस्त्याची जबाबदारी आहे. मात्र त्यांनी डागडुजी केली नाही, असा आरोप संतोष बारगळ, दीपक पाटील, नारायण ढंगे, कचरू चोपडे यांनी केला. अपघानंतर ठेकेदाराने धाव घेत अंधारात खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.