आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्य:पळशी झाशी शिवारामधील घटना; विहिरीचे खोदकाम करताना अंगावर वीज पडून दोन शेतमजुरांचा मृत्य

संग्रामपूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला तर तालुक्यातील पळशी झाशी शिवारात विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी पळशी झाशी शिवारात क्रेनच्या सहाय्याने विहिरीचे खोदकाम करत असताना मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत दोन शेतमजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन शेतमजूर जखमी झाले आहेत. ही घटना आज २३ जून रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. मृत शेतमजुराचे नाव संजय उत्तम मारोडे वय ५० वर्ष व रवि संजय भालतडक वय ३० अशी आहेत.

विहिरीचे खोदकाम करणारे शेतमजूर संजय उत्तम मारोडे व रवि संजय भालतडक या दोघांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत जखमी झालेले मजूर मंगेश बारब्दे व नंदू मधुकर मारोडे यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात हलवले. घटनेची मिळताच तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावर यांनी तत्काळ सूत्रे हलवून घटनास्थळी प्रभारी मंडळ अधिकारी जी. आर. राऊत, तलाठी डी. एच. जाधव यांनापाठविले. यावेळी महसुल कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करुन तहसीलदार वरणगावकर यांना अहवाल सादर केला.

खेलबारी शिवारातही एक युवक ठार; दोन जण जखमी

जळगाव जामोद शेतात काम करत असताना अचानक अंगावर वीज पडल्याने एका सत्ताविस वर्षीय मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज २३ जून रोजी दुपारच्या सुमारास खेलबारी शिवारात घडली. खेलबारी शिवारात म. सादीक म. याकुब यांचे गट क्रमांक १२१ मध्ये शेत आहे. या शेतात सागर नामदेव दिघडे वय २७ हा युवा मजूर काम करत होता. दुपारच्या सुमारास अचानक विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी शेतात काम करीत असतांना सागर दिघडे याच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.

त्या सोबतच आज खांडवी येथील शेतकरी नागोराव विश्वनाथ सारोकार यांच्या शेतात चरत असलेल्या म्हशीवर वीज कोसळून तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना तालुक्यातील इस्लामपूर येथे घडली. शेतात काम करीत असतांना गणेश प्रेमसिंग पावरा वय १९ हा वीज पडून जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. तर तिसरी घटना खेर्डा खुर्द येथे घडली. खेर्डा येथील समाधान पांडुरंग गवई हे शेतात काम करीत असताना दुपारच्या सुमारास अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत ते जखमी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...