आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळ:वसुली होईना महामंडळाला मिळायचे दरमहा 10 ते 11 लाखांचे उत्पन्न ; दुकानांचे दीड कोटी रुपये भाडे थकले

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मार्च २०२० पासून एसटीच्या औरंगाबाद विभागातील आठ डेपो तसेच इतर ठिकाणची उपाहारगृहे, पार्किंग व स्टॉलचे दीड कोटी रुपयांचे भाडे भाडेकरूंनी दिले नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे साधन ठप्प झाले आहे. विभागाला आधी दरमहा १० ते ११ लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता भाडेकरूंकडे जवळपास दीड कोटी थकले आहेत. एसटी प्रशासनाने गाळेधारक, उपाहारगृह चालकांना नोटीस देऊनही भाडे वसूल झालेले नाही. औरंगाबाद विभागातील मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकासह पैठण, कन्नड, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव आदी तालुक्यांमध्ये बसस्थानकात उपाहारगृहे, पार्किंग, विविध फळांचे स्टॉल, जनरल स्टोअर, पेपर दुकान, लॉटरी सेंटर आदींची दुकाने भाड्याने दिलेली आहेत. यातून एसटी महामंडळाला वर्षाकाठी किमान दोन कोटी उत्पन्न मिळते. परंतु मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन व त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी वाहतूक कोलमडली होती. स्थानकावर प्रवासी येत नसल्याने भाडेकरू व्यापाऱ्यांचेही उत्पन्न घटले. या ठिकाणी असलेल्या विविध व्यावसायिक आस्थापनांचेही भाडे थकले आहे. त्यासाठी औरंगाबाद विभागाच्या वतीने वारंवार भाडे वसुलीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. आतापर्यंत चार नोटिसा बजावण्यात आल्या. त्यापैकी केवळ तीस टक्केच भाडेकरूंकडून भाडे वसूल झाले. ७० टक्के दुकानदारांकडे अजूनही मोठी थकबाकी आहे. पार्किंगमधून मिळतात महिना साडेचार लाख मध्यवर्ती व सिडको बसस्थानकात दुचाकींची पार्किंग ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. त्याचे मासिक भाडे किमान साडेचार लाख आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या उपाहारगृहाचे मासिक भाडे ९० हजार आहे. तालुक्याच्या ठिकाणी उपाहारगृहे आहेत. तसेच मध्यवर्ती बसस्थानकावर ८ विविध स्टॉल, सिडको येथे उपाहारगृह, ८ स्टॉल, कन्नड, गंगापूर, सिल्लोड, सोयगाव, पैठण येथे उपहारगृह, पैठण, बिडकीन, पाचोड आदी ठिकाणी २० दुकाने भाड्याने दिलेली आहेत. त्यांचे मासिक भाडे ५ ते २० हजार रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...