आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू:मलेरिया, स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ; आहारात फळे, पालेभाज्यांचा समावेश करण्याचे डॉक्टरांचे आवाहन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा सुरूच झाल्यावर पावसाळी आजार डोके वर काढतात. गेल्या काही दिवसात बदलत्या वातावरणामुळे जिल्हाभरात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, डायरिया, चिकन गुनिया, स्वाईन फ्लू सारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी शासकीय व खासगी दवाखान्यांमधील ओपीडी दुपटीने वाढली आहे. हे रुग्ण प्रामुख्याने घशाचा संसर्ग, सर्दी-खोकला, व्हायरल फिव्हर, बालदम्याचे आहेत. वातावरणातील बदलामुळे हे रुग्ण वाढले असून नागरिकांनी घरी उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

डेंग्यूमुळे 2 रुग्णांचा मृत्यू

आठवड्यापासून कधी ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल आजाराचे रुग्ण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. डेंग्यूमुळे जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या रुग्णामुळे शहरासह ग्रामीण भागातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात ओपीडी रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही रुग्ण कोरोनाच्या भीतीने डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी ही फ्लूची लक्षणे आहेत. यामुळे लक्षणे दिसताच उपचार घ्यावे. फ्लू किंवा व्हायरलच नव्हे तर कोरोनादेखील वेळीच उपचार घेतले तर पूर्णपणे बरा होतो.

लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवा

व्हायरल आजाराचे विषाणू नाक किंवा तोंडावाटे शरीरात प्रवेशतात. यामुळे रुग्णामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्यावे, कोणताही आजार अंगावर काढू नये. पावसाळा ऋतू वातप्रकोपाचा असतो. यामुळे वृद्धांमध्ये वाताचे प्रमाण जास्त असते. वाताचे विकार वाढल्याने बद्धकोष्ठता, हातपाय आखडणे असे विकार वाढतात.

अशी घ्या काळजी

दररोज तेलाने मालिश करावी. लहान मुलांना उकळून थंड केलेल्या पाण्याऐवजी केवळ कोमट करुन पाणी द्यावे. पाणी अधिक उकळल्यास बाष्प निघून क्षारयुक्त पाणी शिल्लक राहते. हे क्षारयुक्त पाणी अधिक धोकादायक असते. यामुळे उकळण्याऐवजी कोमट पाणी पिणे अधिक योग्य आहे. पावसाळ्यात डासांचा उद्रेक वाढतो. यामुळे डेंग्यू, मलेरिया चा धोका असतो. त्यामुळे रात्री मच्छरदाणीत झोपावे. दरवाजे व खिडक्यांना जाळ्या बसवाव्या. घराच्या परिसरात पाणी साचू नये.

फळे, पालेभाज्यांचा आहारात समावेश करा

रोजच्या आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांना अधिक महत्व द्या. हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणावर असतात. तर सर्व प्रकारचे जीवनसत्व असलेल्या फळांचा देखील समावेश करावा. जंक फूड पासून सध्यातरी दूर राहण्याचा डॉक्टरांकडून सल्ला देण्यात येत आहे.

असा आहे रुग्णांचा आकडा

जिल्ह्यात एकूण 541 जणांची तपासणी केली.त्यापैकी स्वाइन फ्लू 61 तर डेंग्यूचे 118 रुग्ण आढळून आलेले आहेत. तर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घाबरून न जाता वेळेत डॉक्टरांकडे जावं. तसेच लसीकरण ही यावर उपलब्ध आहे.
- डॉ. अभय धानोरकर, जि. प. आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...