आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणने खर्चाची तूट भरून काढण्यासाठी वीज दरवाढ नव्हे, तर अधिभार वाढवले आहेत. स्थिर आकार प्रति ग्राहक ३ रुपये तर इंधन समायोजन आकार ६५ पैसे ते २ रुपये ३५ पैशांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे २ कोटी ८८ लाख ६४ हजार १२८ ग्राहकांना दरमहा कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. विशेष म्हणजे महावितरणचे अधिकारी यावर काही उत्तर देण्यास तयार नाहीत.
उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने खर्चाची तूट भरून काढण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात महावितरणने इंधन समायोजन आकार लागू केला. तसेच मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणी स्थिर आकारातही प्रति ग्राहक ३ रुपये वाढवले आहेत. आता हे दर कायमस्वरूपी लागू झाल्यात जमा आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसह सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास १० लाखांवर ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे.
अधिकारी अनभिज्ञ
स्थिर आकार दरवाढ का केली, याबाबत स्थानिक महावितरण अधिकारी ते मुंबई प्रकाशगड मुख्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी स्थिर आकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. तर, एक अधिकाऱ्याने विदर्भ, मराठवाडा आदी विभागातील ग्राहकांना स्थिर आकार आकारला जात असल्याचे सांगितले.
सवलत, विलंब शुल्क, व्याज
वेळेत वीज बिल भरले तर १० रुपये सवलत मिळते. नाही तर १० रुपये विलंब शुल्क भरावे लागते. महिना व पुढे बिल थकवले तर १८% व्याज भरावे लागते. एवढे व्याज राष्ट्रीयीकृत बँकादेखील आकारत नसाव्यात. त्यामुळेदेखील वीज ग्राहकांचा खिसा रिकामा होतो.
दुहेरी वाढ
{ इंधन समायोजन आकार मार्च २०२२ मध्ये नव्हता, तो आता ६५ पैसे ते २.३५ रुपयांप्रमाणे आकारला जात आहे. स्थिर आकार ११२ रुपये होता, तो ३ रुपयांनी वाढवून ११५ रुपये केलेला आहे.
{ राज्यातील सर्व ग्राहकांना वीज शुल्क १६% आकारले जाते. वीज ग्राहक पी. एस. ठोंबरे यांना जुलै महिन्यात दोन बिलांसाठी ३१९ रुपये वीज शुल्क भरावे लागले.
{ अधिभारात वहन आकाराचा बोजा प्रतियुनिट १.३५ रुपये प्रतिग्राहक भरावा लागतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.