आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजार:औरंगाबादमध्ये पुन्हा हॅपी हायपोक्सिया रुग्णांत वाढ; ऑक्सिजन पातळी 26 पर्यंत खाली, घाटीत वाढताहेत मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • डाॅक्टरांचा सल्ला ताप, सर्दी, खोकला असल्यास उपचार घ्या

औरंगाबादमध्ये गेल्या वर्षी कोरोना संकट सुरू झाल्यावर हॅपी हायपोक्सियामुळे मृत्यू होत होते. तसेच मृत्यू पुन्हा होत आहेत. धक्कादायक म्हणजे ऑक्सिजन पातळी २६ इतकी खाली येत आहे. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण इतके कमी होत असल्याचे रुग्णांना अखेरच्या टप्प्यात लक्षात येत असल्याने हा प्रकार जीवघेणा ठरत आहे.

आठवड्याभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर मृत्यूमध्येही वाढ होत आहे. मात्र, यामध्ये पुन्हा कोरोना अंगावर काढणे. दवाखान्यात न दाखवणे, डाॅक्टरांचा सल्ला टाळणे रुग्णाच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे घाटीत आल्यानंतर अवघ्या २४ ते ४८ तासांत या रुग्णाला मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे यामध्ये दम लागतो. मात्र, तो कळत नाही.

असे होत आहेत मृत्यू : ६२ वर्षांची महिला फुलंब्री येथून औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल झाली. त्यांची ऑक्सिजन पातळी ५० टक्के इतकी होती. त्या ९ मार्चला दाखल झाल्या आणि १३ तारखेला त्यांचा मृत्यू झाला. ६५ वर्षांची महिला कन्नडहून ८ मार्च रोजी घाटीत दाखल झाली. तिची आॅक्सिजन पातळी फक्त २५ टक्के होती. १३ तारखेला तिचा मृत्यू झाला. सिडको एन ९ येथील एक जण १२ तारखेला दाखल झाला. त्याची ऑक्सिजन पातळी २६ टक्के होती. त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. तेरा मार्चला त्याचा मृत्यू झाला. ७६ वर्षांची भोकरदनची महिला बारा तारखेला दाखल झाली होती. तेव्हा तिची आॅक्सिजन पातळी ६४ टक्के होती. तिचाही मृत्यू झाला.

अशी आहेत लक्षणे
शरीराच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ टक्केपेक्षा कमी होऊनही रुग्णाला त्याची जाणीव न होणे याला हॅपी हायपोक्सिया म्हणतात. त्यामुळे थोडासा ताप, अंगदुखी, सर्दी किंवा खोकला असेल तर नजीकच्या दवाखान्यात जा. दुखणे अंगावर काढू नका, असा सल्ला घाटीतील मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिला आहे. धूत हॉस्पिटलमधील कोविड वाॅर्डचे क्लिनिकल प्रमुख डॉ. प्रसाद पुंडे यांनी सांगतिले की, आमच्याकडेही ६० ते ७० टक्के ऑक्सिजन पातळी कमी झालेले रुग्ण येत आहेत.

उशिराने रुग्ण होताहेत भरती
गेल्या आठवड्याभरापासून उशिराने रुग्ण दाखल होत आहेत. ऑक्सिजन पातळी २५ पर्यंत कमी झाल्यावर घाटीत येणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. ग्रामीण भागातील रुग्ण कोरोना झाल्यावर दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पातळी खूप कमी झाल्याचे दिसत आहे. कोरोनाला न घाबरता उपचार घेणे महत्वाचे आहे. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

निमोनिया वाढल्यामुळे ऑक्सीजन लेव्हल कमी होऊन फुफुसाची कार्यक्षमता कमी होते.यामध्ये पहिला फोटो नॉर्मल रुग्णाचा आहे.तर दुसरा फोटो ९० ते ९५ ऑक्सिजन लेव्हलचा आहे.तर तीन नंबरचा ८५ पेक्षा कमी चार नंबर ८० पेक्षा कमी पाच नंबर ६० पेक्षा कमी ऑक्सीजन लेव्हलचा आहे.

बातम्या आणखी आहेत...