आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीचे प्रमाण:रिक्षाचालकांत वाढले गुन्हेगारीचे प्रमाण; 11 महिन्यांत 22 गंभीर प्रकरणांत सहभाग

औरंगाबाद / सुमीत डोळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजारो नागरिक रिक्षांमधून प्रवास करतात. मात्र, आता हाच रिक्षाचा प्रवास दिवसेंदिवस शहरात धोकादायक होत आहे. मूळ मालकांनी भाडेकरारावर दिलेल्या अनेक रिक्षांचे चालक गुन्हेगारी मार्गावर जाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यांमध्ये २२ गंभीर गुन्ह्यांत रिक्षाचालकांचा थेट सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पिस्टल, तलवार बाळगणे, प्रवाशांना मारहाण, लूटमार, महिलांची छेड काढण्यासह थेट नशेच्या गोळ्या विकणाऱ्या एजंटांचा समावेश आहे. यातील बहुतांश चालक हे भाडेतत्त्वावर रिक्षा घेऊन चालवतात हे विशेष.

‘नीट’ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने १३ नोव्हेंबर रोजी चालत्या रिक्षातून उडी मारली. रिक्षाचालक सय्यद अकबर (३९, रा. पडेगाव) याने आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे आपणाला हे कृत्य करावे लागले, असे तिचे म्हणणे आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देशभर व्हायरल झाले व गुन्हेगारी वृत्तीच्या रिक्षाचालकाविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला.

शहरातील या २२ गुन्ह्यांत रिक्षाचालक सहभागी {१७ नोव्हेंबर : पाठलाग करत मुलीचे नाव हातावर गोंदवणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा. {१३ नोव्हेंबर : अश्लील प्रश्न विचारल्याने सतरा वर्षांच्या मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारली. {१० नोव्हेंबर : चालक नशेत असल्याने सेंट्रल नाका भागात विद्यार्थ्यांना नेणारी रिक्षा उलटली. {३ नोव्हेंबर : वेदांतनगर भागात पैशांवरून वाद, रिक्षाचालकाची प्रवाशास मारहाण, सामान फेकले. {१८ ऑक्टोबर : प्रवाशाला रात्री अयोध्या मैदानावर नेऊन चालकाने लुटले, अंगठ्या, मोबाइल हिसकावून नेले. {४ ऑक्टोबर : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून हॉटेलचालकाची लाखोंची फसवणूक, रिक्षाचालक आरोपी. {२६ सप्टेंबर : रिक्षात तलवार घेऊन फिरणारा चालक क्रांती चौक पोलिसांकडून अटकेत, आतापर्यंत त्याच्यावर ८ गुन्हे. { १० सप्टेंबर : एपीआय कॉर्नरवर सीए मुलगी पायी जात असताना रिक्षाचालकाने तिचा मोबाइल हिसकावून नेला. {१० सप्टेंबर : फुलंब्रीला जाणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकाने महिलेच्या मदतीने लुटले. छावणीत गुन्हा दाखल. {२५ ऑगस्ट : प्रवासात ओळख झालेल्या महिलेला जंगलात नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न. रिक्षाचालकावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा. {३१ जुलै : ८४० नशेच्या गोळ्यांसह रिक्षाचालकास एनडीपीएस पथकाने पकडले. {१५ जुलै : पिस्टल वापरणारा रिक्षाचालक अटकेत, गोल्डन गँगचा तो सदस्य. {५ जून : गुजरातवरून शहरात स्थायिक झालेला, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारा चालक नशेच्या गोळ्या विकताना अटक. {२० जून : हर्सूल परिसरात रिक्षात महिलेची छेड, गुन्हा दाखल. {१२ जून : नशेच्या गोळ्या विकणारा रिक्षाचालक एनडीपीएसकडून अटकेत. {१० जून : बँकेची परीक्षा तयार करणाऱ्या विद्यार्थ्याची लॅपटॉप व मोबाइल असलेली बॅग रिक्षाचालकाने लंपास केली. चार दिवसांनंतर चालक अटकेत. {४ जून : फाजलपुऱ्यात रिक्षात बसून दारू पिण्यास विरोध केल्याने दगडफेक, मारहाण. यातही रिक्षाचालक होते. {३० मे : चित्रा शरद कुलकर्णी (५९) यांचा बेशिस्त व सुसाट वेगात जाणाऱ्या रिक्षाचालकाने कट मारल्याने तोल गेला. यात समोरून आलेल्या हायवाखाली त्या चिरडल्या गेल्या. {१० मार्च : रिक्षात प्रवाशाला बळजबरीने बसवून मोबाइल, रोख रक्कम घेऊन लूटमार करणारा रिक्षाचालक अटकेत. {१६ मार्च : समर्थनगर येथील बिल्डरला लुटणाऱ्या महिलेच्या टोळीत रिक्षाचालकाचाही सहभाग होता. {१ मार्च : मंगळसूत्र चोरीत पकडलेला आरोपी भाड्याची रिक्षा चालवत होता. {२५ फेब्रुवारी : सुसाट रिक्षाचालकाने न्यायालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला उडवून गंभीर जखमी केले.

रेल्वेस्थानकावरही प्रवाशांची सुरक्षा धोक्यात रेल्वेस्थानकावर रात्री दहा वाजेनंतर नशेखोर, गुन्हेगार, भिक्षेकऱ्यांचा वावर वाढतो. पहाटेपर्यंत १२ पेक्षा अधिक रेल्वेने प्रवासी ये-जा करतात. हीच परिस्थिती मध्यवर्ती बसस्थानक, सिडकाे व बाबा चौकात पाहायला मिळते. गुन्हेगारांचा वावर, रिक्षाचालकांच्या विचित्र वागण्यामुळे त्यांना त्रास होतो. स्टेशनवरील पार्किंगचे कर्मचारीही दादागिरी करून प्रवाशांना लुटतात. येथील पोलिस चौकीत कचरा साचला असून रात्री त्यात भिक्षेकऱ्यांचा मुक्काम असतो. या भागात गस्त घालण्याकडे पोलिस मात्र लक्ष देत नाहीत.

१५ महिन्यांतच पुनरावृत्ती २८ ऑगस्ट २०२१ रोजी मोंढा नाका येथे वाहतूक पोलिसांच्या कार्यालयासमोर अकरावीतील मुलीने रिक्षातून उडी मारली होती. नशेतील ऑटोचालकाने तिच्याशी गैरप्रकाराचा प्रयत्न केला होता. १३ नोव्हेंबर रोजी सिल्लेखाना चौकात अशीच घटना घडली. म्हणजे अशा गुंड प्रवृत्तीच्या चालकांमध्ये १५ महिन्यांत दरारा निर्माण करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

आरोपीत परप्रांतीय जास्त बहुतांश रिक्षा या भाडेतत्त्वावर चालवल्या जातात. मूळ मालकानंतर जवळपास दुसरा, तिसरा पोटभाडेकरू ही रिक्षा चालवतो. त्यातही अनेक जण हे परप्रांतीय किंवा दुसऱ्या शहरातून स्थलांतरित झालेले असतात. मूळ रिक्षाचालकांकडेही त्यांची माहिती नसते. २२ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांपैकी तीन रिक्षाचालक हे परप्रांतीय आहेत.

परवाना नसलेल्या चालकांकडून गैरप्रकार सर्वच रिक्षाचालक गुन्हेगार नाहीत. काही चुकीच्या लोकांमुळे इतर रिक्षाचालक-मालक बदनाम होताहेत. शहरात परवाना नसलेले अनेक ऑटो चालतात. पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई केल्यास गैरप्रकारांना निश्चित आळा बसेल. आम्हीही संघटनेच्या माध्यमातून वारंवार पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांना या मागणीसाठी निवेदने दिली आहेत. - कैलास शिंदे, रिक्षाचालक संघर्ष कृती महासंघ

बातम्या आणखी आहेत...