आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य स्पर्धा:नाट्यस्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमधील आनंदाची वृद्धी; कार्यकारी संचालक रोहिदास म्हस्के यांचे मत

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तणावात काम करणाऱ्या विद्युत कर्मचारी, अधिकाऱ्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत या उद्देेशाने नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे मनोगत कंपनीचे कार्यकारी संचालक रोहिदास म्हस्के यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे आयोजित नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. तापडिया नाट्यगृहात महापारेषण कंपनीच्या आंतरमंडळ नाट्य स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी दीपज्योती नाटकाला निर्मितीचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

म्हस्के म्हणाले की, कोरोनासारख्या महामारीच्या काळातही वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठ्याचे कर्तव्य चोखपणे पार पाडले, मात्र अत्यावश्यक सेवेत काम करताना त्यांना तणावाचा सामना करावा लागला. तो कमी व्हावा तसेच कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी महापारेषण कंपनीतर्फे एक वर्ष नाट्य स्पर्धा व दुसऱ्या वर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी मुख्य अभियंता रंगनाथ चव्हाण म्हणाले की, नाटकातून व खेळांमधून कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये संघ भावना तयार होते. अनेक अडथळे घेऊनही स्पर्धा घेण्यात आल्या. या नाट्यस्पर्धेत त्यात पारितोषिके मिळवणाऱ्याचे रंगनाथ चव्हाण यांनी कौतुक केले.यावेळी मुख्य कार्यालय मानव संसाधन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक सुधीर वानखेडे, अधीक्षक अभियंता संजय परदेशी, मिलींद बनसोडे, रंगनाथ शेळके, संजीव कांबळे व नाट्यपरीक्षक जयंत शेवतेकर, ॲड. सुजाता पाठक, किशोर शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपज्योती नाटकाला मिळाली १० पारितोषिके
डॉ. चंद्रकांत रमेशचंद्र शिंदे लिखित व अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र धनवे दिग्दर्शित “दीप ज्योती” या दोन अंकी नाटकाला एकूण १० पारीतोषिकांसह निर्मितीचे प्रथम पारितोषिक मिळाले. स्पर्धेत अउदा प्रकल्प मंडल औरंगाबादतर्फे सादर झालेल्या अरविंद जगताप लिखित “स्टॅच्यू ऑफ लिबर्टी” या नाटकाला निर्मितीमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला.

परळी मंडळातर्फे रविशंकर झिंगे लिखित “भयरात्र” हे नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारे महापारेषणचे नागार्जुन अकुला व राज्यस्तरीय दोन अंकी नाट्यलेखन व एकांकिका स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविणारे शशिकांत इंगळे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण राज्यातील महापारेषणच्या निवडक नाट्यकलावंतांचा एक संघ तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्याचे आश्वासन वानखेडे यांनी दिले. नाट्यसंघांच्यावतीने माधव चिल्के, अमोल अरणकल्ले व शशिकांत इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...