आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:शहरात वाढीव पोलिस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरूप, संचारबंदीची कडक अमलबजावणी

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

हिंगोली शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची सोमवारपासून (ता. ६) कडक अंमलबजावणी केली जात आहे. शहरांमध्ये ठिकाणी पोलिस बंदोबस्त असल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. तर कन्टोनमेंट भागांमध्ये प्रशासनाच्या वतीने जनजागृती करून दोन आरोग्य पथके स्थापन करण्यात आले आहेत.

हिंगोली शहरामध्ये मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. शहरातील रिसाला बाजार, तलाब कट्टा व महात्मा गांधी चौक भागांमध्ये रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांचे सामाजिक संक्रमण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली शहरामध्ये शुक्रवारपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार आज सकाळपासूनच शहरातील सर्व ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपाधीक्षक रामेश्वर वैंजणे, ए. जी.  खान यांच्या पथकाने शहरातील सर्व भागांची पाहणी करून पोलिस विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरांमध्ये येणाऱ्या सर्व वाहनचालकांची चौकशी करून त्यांना परत पाठवण्यात आले. वैद्यकीय सेवेसाठी मात्र सूट देण्यात आली आहे. 

वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमकांत चिंचोळकर व पथकाने शहरांमधील येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर कर्मचारी तैनात करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. शहरातील वाढता पोलीस बंद लक्षात घेता शहराला छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र आहे.

दरम्यान  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी  तलाबकट्टा, महात्मा गांधी चौक, रिसाला बाजार भागात भेट देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर राहुल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोग्य पथके स्थापन  केले असून यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्दी, खोकला व तापीच्या रुग्णांची सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत या भागांमध्ये तपासणी केली जाणार आहे. तसेच संशयित रुग्णांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील सर्व दुकाने बंद असल्यामुळे शहरात शुकशुकाट निर्माण झाला आहे.

बाहेर गावातील गावकऱ्यांनी शहरात प्रवेश करू नये : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली शहरात शुक्रवारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर गावातील नागरिकांनी वैद्यकीय कारणाशिवाय शहरात प्रवेश करू नये. शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर तसेच वाहनचालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे .

Advertisement
0