आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Increased The Number Of Students From 12 To 104 While Staying At Headquarters; The School Was Crowded Because Of The Teacher From Valdgaon | Marathi News

शिक्षक दिन:मुख्यालयी राहून विद्यार्थिसंख्या 12 वरून 104 वाढवली ; वळदगावच्या शिक्षकामुळे शाळा गजबजली

वाळूज / संतोष उगले25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकदिनी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान तपासून पाहिले. त्यातून शिक्षण व विद्यार्थ्यांचे जे काही चित्र समाेर आले ते सर्वांनी पाहिले. दुसरीकडे बजाज गेट, वळदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सात वर्गांतील ८२ विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी गेल्या तीन वर्षांपासून एकाच शिक्षकावर आहे. ते मुख्यालयी राहतात. त्यांच्या शाळेतील साई मनपुरे हा विद्यार्थी डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च सेंटर रामेश्वरम येथील स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज २०२१ प्रकल्पात सहभागी झाला होता. शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध नसतानाही या शिक्षकाने विद्यार्थी संख्या १२ वरून १०४ वर नेली आहे. वळदगाव शिवारातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरपंच अमर राजपूत, उमेश घटे आदींसह पालकांनी शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर काटेरी झुडपात हरवलेली आणि गुरे बांधण्याची जागा बनलेली दोन खोल्यांची शाळा दहा वर्षांनी पुन्हा २१ ऑगस्ट २०१९ रोजी १२ विद्यार्थ्यांवर सुरू झाली. कोरोनाकाळात बहुतांश सर्वच विद्यार्थी ऑनलाइन धडे गिरवत होते. आपली शाळा बंद हाेऊ नये म्हणून मुख्याध्यापक विजय लिंबोरे यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना १० टॅब उपलब्ध करून दिले. त्यांना इम्पाटिकोसह झूम अॅप, स्काइप तसेच ऑनलाइन अभ्यास कसा करावा याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर पुढील १२ दिवसांनी लॉकडाऊन लागला. मात्र, १० विद्यार्थी याप्रमाणे एकत्र येऊन ते टॅबच्या मदतीने शिक्षण घेत होते.

शाळेच्या जागेची नोंद जि.प. कडे करा
शासनाकडे ‘शून्य शिक्षक’ अशी या शाळेची नोंद आहे. रिक्त पद भरावे म्हणून मागील एका वर्षापासून प्रयत्न करत आहे. पण पद भरले जात नाही. गायरान जमिनीवरील या शाळेच्या जागेची नाेंद जिल्हा परिषदेकडे होणे गरजेचे आहे.
- विजय लिंबोरे, शिक्षक

बातम्या आणखी आहेत...