आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरात भाजीमंडई भागात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून ता. ९ बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हिंगोली शहरातील भाजीमंडई भागात गुरुवारी ता. ८ सकाळी अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर काही जणांनी हल्ला केला. यामध्ये अभियंता गजानन हिरेमठ, कर्मचारी विजय शिखरे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर विजय शिखरे यांच्या तक्रारीवरून ३० जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, जातीवाचक शिवीगाळ करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे, बाळू बांगर, मुंजाजी बांगर, शाम माळवटकर, विनय साहू, डी. बी. ठाकूर, गजानन हिरमेठ, रवी दरक, किशोर काकडे, झिंगराजी वैरागड, गजानन बांगर यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. आरोपींना अटक होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरु ठेवले जाणार असल्याचे बाळू बांगर यांनी सांगितले. तसेच वसमत, कळमनुरी पालिकेत तर सेनगाव व औंढा नागनाथ नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लाऊन कामकाज सुरु केले आहे.
दोन आरोपींना अटक ः यतीश देशमुख, सहाय्यक पोलिस अधिक्षक हिंगोली
या प्रकरणात घटनास्थळाच्या परिसरातील दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. त्यानंतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली जात आहे. आता पर्यंत दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.