आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत, इटली, इंडोनेशिया करणार जी-20 परिषदेचे आयोजन:परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचे ऐतिहासिक दर्शन घडवू - डॉ. कराड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत, इटली व इंडोनेशिया हे तीन देश जी-20 परिषदेचे आयोजन करणार आहेत. त्या अनुषंगाने 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद येथे होणारी जी-20 परिषद ' महिला व बालकल्याण ' या विषयावर आधारित असणार आहे.

या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक दर्शन जगाला घडविण्याची संधी मिळणार असल्याने प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून ही परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज येथे केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 शिखर परिषदेच्या नियोजनाच्या आढावा बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जी-20 परिषद केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने यशस्वी करण्यात येणार असून यासाठी राज्य शासनाकडून 50 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध असल्याचे सांगितले. कराड म्हणाले परिषदेच्या यशस्वीततेसाठी सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय काम करावे. अनेक देशातील प्रतिनिधी येणार असल्याने विद्यापीठातील भाषा विभागातील विद्यार्थ्यांबरोबरच अनेक भाषांचे जाणकार असणारे उद्योजक देखील परिषदेच्या प्रतिनिधींसोबत शहरासंबंधी माहिती देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.

या परिषदेत एकूण 20 विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. यामध्ये आठ विषय हे अर्थ विषयक तर इतर 12 मुद्द्यामध्ये औद्योगिक, उद्योग, व्यापार, पर्यटन, आदी विषयांवर परिषदेचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. तसेच वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथील पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत. त्या अनुषगाने अजिंठा पर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. जगभरातील सुमारे 500 प्रतिनिधी औरंगाबाद येथे भेट देणार आहेत.

या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेसोबतच वेरुळ, अजिंठा येथील सोईसुविधा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक, पाणी पुरवठा, आदी व्यवस्थेचाही आढावा कराड यांनी घेतला.

जी-20 परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच या कालावधीत वेरुळ महोत्सव तसेच सांस्कृतिक पंरपरेचे तसेच औद्योगिक व पर्यटन स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन काटेकोरपणे करा, आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच सर्व सोईसुविधा देण्याबाबत कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना डॉ.कराड यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...