आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, आपण एकदा तरी भारतीय संघाकडून खेळताना देशाला पदक जिंकून द्यावे. असेच स्वप्न उराशी बाळगलेल्या 9 औरंगाबादच्या खेळाडूंची गुमरेज (पोर्तुगाल) येथे 14 ते 19 जूनदरम्यान होणाऱ्या 21 व्या जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) मध्ये भारतीय संघाच्या स्पर्धेपूर्व सराव शिबिराला बुधवारी सुरुवात झाली आहे. एकूण 15 सदस्यीय राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारतीय संघामध्ये महाराष्ट्राच्या 9 खेळाडूंसह सेना दलाचे 4 खेळाडू, गुजरातचे 2 व मणिपूरच्या एका खेळाडूची निवड झालेली आहे. सेनादलाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुनील छत्री खेळाडूंना मार्गदर्शन करतील. येत्या 13 जून रोजी संघ दिल्ली मार्गे पोर्तुगालला रवाना होणार आहे.
मार्चमध्ये बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय संघ निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत या खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, तिहेरी, समूह आणि एरोडान्स अशा स्पर्धा प्रकारात भारतीय खेळाडू आपले कौशल्य सादर करतील. संघाच्या प्रशिक्षकपदी औरंगाबादच्या हर्षल मोगरे यांची नियुक्ती केली आहे. तसेच एशियन जिम्नॅस्टिक युनियनचे तांत्रिक समिती सदस्य डॉ. मकरंद जोशी हे खेळाडूंना शिबिरात मार्गदर्शन करत आहेत.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे :
पुरुष एकेरी - जॉनी कुमार (सेनादल). महिला एकेरी - अरीहा पंगंबम (मणिपूर). मिश्र दुहेरी - ऋग्वेद जोशी व साक्षी लड्डा (महाराष्ट्र). मिश्र दुहेरी - प्रकृती शिंदे व निशांत चौहान (गुजरात). तिहेरी - जॉनी कुमार, मोहम्मद नयमुद्दीन, संदीप रमोला (सेनादल). समूह - धैर्यशील देशमुख, संदेश चिंतलवाड, गौरव जोगदंड, अभय उंटवाल, ऋग्वेद जोशी (महाराष्ट्र). एरोडान्स - साक्षी लड्डा, सिल्वी शहा, साक्षी डोंगरे, विजय इंगळे, धैर्यशील देशमुख, संदेश चिंतलवाड, गौरव जोगदंड, अभय उंटवाल (महाराष्ट्र) प्रशिक्षक - सुनील छत्री (सेनादल), हर्षल मोगरे (महाराष्ट्र). व्यवस्थापक - टी.पी. किरण (कर्नाटक) व संघ प्रमुख - दिलीप सर्वैया (गुजरात).
पदक जिंकूनच परतणार : ऋग्वेद
स्वप्न तर खुप मोठे आहे. परंतू ते एका क्षणात पूर्ण होत नाही, त्यासाठी खुप मेहनत करावी लागते. आमच्या खेळात सातत्य ठेवावे लागते. एक-एक टप्पा गाठण्याचा माझा प्रयत्न असतो. देशाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचे सोने करण्याची तयारी सध्या मी करतोय. शिबिरात आमचा खुप चांगला सराव सुरू आहे. ताळमेळही जुळून आला आहे. आता केवळ सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवले आहे. निश्चित देशासाठी पदक जिंकूनच आम्ही परतणार आहोत, असे विश्वास आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋग्वेद जोशीने व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.