आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:मराठवाड्यात ऑक्सिजनचा औद्योगिक वापर बंद; वैद्यकीय उपचारांसाठी राखीव, विभागीय आयुक्तांची 8 जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, 60 मेट्रिक टनने मागणी वाढणार

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा औद्योगिक वापर बंद करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आता केवळ वैद्यकीय उपचारांसाठी ऑक्सिजनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

केंद्रेकर म्हणाले की, ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता विभागात ऑक्सिजनचे टँकर वाढवण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. सध्या मराठवाड्यात आठ जिल्ह्यांत दररोज १६० मेट्रिक टन इतकी मराठवाड्याची गरज आहे. मात्र रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर येत्या काही दिवसांत ही मागणी दररोज २२० टन इतकी जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

एका मिनिटाला प्रतिरुग्ण २१ लिटरची गरज : मराठवाड्यात प्रत्येक मिनिटाला २१ लिटर ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा योग्य वापर व्हावा, यासाठी घाटी तसेच सर्व जिल्हाधिकारी आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टर यांची व्हिडिअाे काॅन्फरन्स दोन दिवसांत घेण्यात येणार आहे. या माध्यमातून ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घेण्याच्या संदर्भातदेखील नियोजन केले जाणार आहे. ऑक्सिजनचे टँकर वेळेत येतील याचे नियंत्रण अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार आहेत.

३३ रुग्ण वेटिंगवर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजनचे ११९, आयसीयू १६१ (एकूण २८०) तर, विनाऑक्सिजन असे सगळे मिळून ५०० बेड आहेत. सध्या सर्व बेड फुल्ल झाले आहेत. वेटिंगवर ३३ रुग्ण आहेत. दरम्यान, ४० केएलचे जेम्बो लिक्विड ऑक्सिजनचा टँक असणारे हे युनिट राज्यातील पहिलेच आहे.

वाढीव ऑक्सिजनचे नियोजन
मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये. प्रशासन त्यांच्या वतीने उपाययोजना करत आहे. मात्र लोकांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. मराठवाड्यात वाढीव ऑक्सिजनचे नियोजन करण्यात येत आहे. - सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त.

पथकाची नियुक्ती केली
जिल्ह्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची मागणी वाढली असल्यामुळे ऑक्सिजनचा २४ तास साठा असणे आवश्यक आहे. जेथे गरज लागेल तेथे ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी. औ.बाद.

मराठवाड्याला दररोज १६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज

नांदेड| जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणखी एका २० केएलच्या ऑक्सिजन टँकची उभारणी करण्यात येत आहे. यापूर्वी या ठिकाणी २० केएलच्या टँकची उभारणी करण्यात आली. त्यामुळे एकूण ४० केएलचे सुसज्ज जम्बो लिक्विड ऑक्सिजन टँक उभारले जाणारे राज्यातील सर्वात मोठे युनिट असणार आहे. रुग्णांची परवड लक्षात घेऊन नव्याने २०० खटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हा टँक लवकर स्थापित व्हावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणेला सूचित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...