आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काय आहे टिनिया कॉर्पोरिस?:​​​​​​​कृष्णेच्या पुरात हजारोंना वाचवणाऱ्या तरुणांना ‘टिनिया कॉर्पोरिस’चा संसर्ग; दोन वर्षांपासून असह्य वेदनांशी तरुणांची झुंज

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सातारा-सांगलीतील 5 तालुक्यांत 5 हजारांवर बाधित

दीड वर्षापूर्वी कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर सांगली-सातारा जिल्ह्यांतील नदीकाठच्या पाच तालुक्यांतील जवळपास २४ गावांमधील पाच हजारांपेक्षा जास्त ग्रामस्थ ‘टिनिया कॉर्पोरिस’ या बुरशीजन्य संसर्गामुळे त्रस्त आहेत. ज्यांनी तासन््तास पुराच्या पाण्यात राहून बचावकार्य केले, ज्यांचा पुराच्या पाण्याशी थेट संपर्क आला त्यांना हा संसर्ग झाला आहे. पुरुषांच्या जांघ, काख, मान व गुडघ्याच्या मागील भागात हा संसर्ग झपाट्याने वाढला. बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील महिलांनाही याचा संसर्ग झाला आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील त्वचारोगतज्ज्ञांकडून ग्रामस्थ उपचार घेत आहेत. हजारो रुपये औषधांवर खर्च करूनही हा संसर्ग कायम आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये कृष्णा नदीला महापूर आला होता. नदीकाठच्या गावातील तरुणांनी पुरातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास एनडीआरएफ, पोलिस, होमगार्ड आणि टेरिटोरियल आर्मीच्या पथकांना बचावकार्यात मदत केली. मात्र, पूर ओसरल्यानंतर २० दिवसांनी ग्रामस्थांच्या शरीरावर पुरळ उठून खाज सुटायला लागली. सुरुवातीला लोकांनी याकडे दुर्लक्ष केले, कालांतराने जखमा वाढत गेल्या. शरीरावर पांढरे चट्टे पडायला लागले. फोडांतून रक्त यायला लागले.

उपचारांवर ७० हजार खर्च
वाळवा येथील तरुण सुजित कांबळे गेल्या दीड वर्षापासून या संसर्गाचा सामना करत आहे. त्याने आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील १३ त्वचारोगतज्ज्ञ आणि ६ इतर डॉक्टरांकडे उपचार घेतले. उपचारांवर ७० हजार रुपये खर्च केले. मात्र, त्याचा आजार बरा झालेला नाही. तो सांगतो, ‘उन्हाळ्यात खूप त्रास होतो. घाम आला की जळजळ होते, फोडांतून रक्त येते.’ सुजितने एनडीआरएफचे जवान आणि पोलिसांना पुराच्या पाण्यात उतरून बचावकार्यात मदत केली होती.

पाण्याशी जास्त संपर्काने संसर्ग
अधिक काळ पाण्यात राहिल्याने, ओले कपडे घातल्याने बुरशीजन्य संसर्ग होतो. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे रुग्णांनी आपले कपडे, साबण व इतर वस्तू वेगळ्या ठेवाव्यात. औषधोपचाराने हा आजार बरा होऊ शकतो. माझ्याकडे आलेल्या जवळपास २० लोकांना मी या आजारातून मुक्त केले आहे. -डी. आर. नलवडे, त्वचारोगतज्ज्ञ, कोल्हापूर

सलग ९ दिवस पाण्यात
महापुरात एनडीआरएफच्या बोटी पाण्यात चालत नव्हत्या. त्यांना ओढण्यासाठी महेश थोरात यांनी मदत केली. त्यांनी पुराच्या पाण्यात सलग ९ दिवस राहून लोकांना बाहेर काढण्यात मोलाचे सहकार्य केले. पूर ओसरल्याच्या २० दिवसांनंतर त्यांच्या शरीरावर पुरळ उठून खाज सुटली होती. त्यांनी आतापर्यंत १० डॉक्टरांकडे उपचार घेतले. उन्हाळा आणि पावसाळ्यात त्रास जास्त होतो असे ते सांगतात. अजूनही त्यांना संसर्ग आहे.

काय आहे टिनिया कॉर्पोरिस?
टिनिया कॉर्पोरिस हा त्वचेचा बुरशीजन्य संसर्ग आहे. तो हात, पाय, टाळू, चेहरा आणि दाढी वगळता शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. याला सामान्यतः ‘रिंगवर्म’ असे म्हटले जाते. कारण, त्यामध्ये गोलाकार (रिंग) जखम असते. महापुरात वाहून आलेल्या मृत जनावरांचे अवशेष पाण्यात मिसळले आणि याच पाण्याच्या संपर्कात लोक आल्याने त्यांना हा आजार झाला असावा, असेही तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जास्त काळ पाण्यात राहिल्याने या बुरशीचा संसर्ग होतो, असे काही डॉक्टरांचे मत आहे. बाधित व्यक्तीच्या शरीरावर पांढरे चट्टे पडतात. यात तीव्र वेदना-जळजळ होते, कधी जखमेतून रक्तही येते.

बातम्या आणखी आहेत...