आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:घरबसल्या लायसन्स काढण्यात अनंत अडचणी, शेकडो अर्ज अजून प्रलंबितच; रहिवासी, आधार लिंकसह नावातील दुरुस्तीमुळे फेटाळले जातात अर्ज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: हरेंद्र केंदाळे
  • कॉपी लिंक
  • दीड हजारपैकी 500 जणांनाच मिळाला परवाना

लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अर्ज भरताना दिलेली माहिती आणि आधार कार्डवरील प्रत्यक्ष माहिती यात तफावत येत असल्याने हजारो अर्ज अद्यापही तसेच पडून आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शिकाऊ परवाना थेट घरी मिळतो. त्यासाठी आरटीओ कार्यालयात जाऊन खेटे घालण्याची आवश्यकता नाही. मात्र शहर आणि एमआयडीसीतील बाहेरगावच्या आणि परराज्यातील हजारो कामगारांनी अर्ज करूनही त्यांचे अर्ज निकाली लागले नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन अर्जाच्या किचकट प्रक्रियेमुळे दोन-दोन महिने अर्ज करूनही परवाना मिळत नसल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता ऑनलाइन माहिती भरताना आधारवरची माहिती अद्ययावत करत असताना पूर्ण विराम, अनुस्वार चुकला तरी अर्जाची पडताळणी होत नसल्याचे सांगण्यात आले.

दीड हजारपैकी ५०० जणांनाच मिळाला परवाना
लॉकडाऊनपासून आतापर्यंत ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांची संख्या दीड हजार आहे. त्यापैकी ५०० जणांनीच माहिती योग्य पद्धतीने भरलेली असल्याने त्यांना शिकाऊ परवाने मिळाले. मात्र आधार कार्डवरील माहिती आणि परवानासाठी अर्ज करताना भरलेली माहितीत तफावत असल्याने एक हजार अर्ज पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा भरावा लागतो अर्ज
ऑनलाइन अर्ज करताना आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक असावा. आधारवरील सर्व माहिती न चुकता भरावी लागते. ऑनलाइन अर्ज भरताना ‘सन ऑफ’ असा रकाना आहे. त्यानुसार आधार कार्डवरही ‘सन ऑफ’ किंवा ‘यांचा मुलगा’ अशा पद्धतीने अर्जावर नोंद असणे आवश्यक आहे. तेव्हाच अर्ज स्वीकृत होऊन परवाना संबंधित पत्त्यावर पाठवण्यात येतो.

काय आहे पर्याय
ज्यांना अशा स्वरूपाच्या अडचणी आल्या आहेत, त्यांनी पाठवलेल्या अर्जात दुरुस्ती करून अर्ज भरावे. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे, अशा उमेदवारांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन संबंधित विभागाला कळवल्यास त्यांच्याकडूनही दुरुस्ती करण्यात येऊ शकते, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिली.

छोटी चूक असली तरी अर्ज घेत नाही
सर्व माहिती ऑनलाइन भरूनच परवाना दिला जातो. अचूक माहिती भरल्यावरच परवाना मिळतो. मोबाइलला आधार लिंक असेल तर तत्काळ ओटीपी मिळताे. ओटीपी नसल्यास अर्ज स्वीकारला जात नाही. नावातील बदल, स्थानिक पत्ता ज्यावर परवाना पाठवायचा आहे, याची अचूक माहिती व पुरावा आवश्यक आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करूनच अर्ज भरला जातो. - संजय मैत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

साेयीपेक्षा अडचणीच जास्त
ऑनलाइन अर्ज करूनही अनेकांना परवाना मिळालेला नाही. हे टाळण्यासाठी सुटसुटीत प्रक्रिया असावी, जेणेकरून लोकांना अडचण येणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या या योजनेत सोयीपेक्षा अडचणीच जास्त येत आहेत. एमआयडीसीतील नागरिकांना अडचण येत आहे. - किरण दळवी, संचालक, श्रीगणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल

दीड महिन्यापासून परवाना नाही
मी पुण्यातून येथे राहण्यासाठी आले आहे. शिकाऊ परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, मला अजूनही वाहन परवाना मिळाला नाही. माझ्या आधार कार्डवर पुण्याचा पत्ता आहे. त्यामुळे मला स्थानिक पत्ता दिल्यावरच परवाना मिळेल, असे सांगण्यात येत आहे. - श्रुती चौधरी, अर्जदार महिला

स्थानिक पुरावा नाही
मी शिक्षक असून वर्षभरापूर्वी नांदेड येथून शहरात माझी बदली झाली आहे. मी ऑनलाइन अर्ज करूनही मला अद्याप परवाना मिळाला नाही. माझ्यासारख्या अनेक जणांच्या अडचणी आहेत. यावर तोडगा निघून परवाना मिळावा. त्यासाठी मला पुन्हा नांदेडला जाऊन येणे शक्य नाही. - महेश कौत्तावार, अर्जदार शिक्षक

बातम्या आणखी आहेत...