आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अखत्यारीत असलेल्या फर्दापूरच्या नॅशनल कॉलेजमध्ये बारावीचे परीक्षार्थी शिक्षकांच्या मदतीने गाइड घेऊन पेपर साेडवत असल्याचा प्रकार ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणला होता. याबाबत ६ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रकाशित होताच शिक्षण विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतली. आैरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश सिल्लोडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आपल्याच शाळा, कॉलेजचे सेंटर देण्यात आले आहे. मात्र त्याचा गैरफायदा अनेक शाळा-महाविद्यालयांनी घेतल्याचे परीक्षेत दिसून आले आहे.
५ एप्रिल रोजी बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर फर्दापूर गावात नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड संचालित नॅशनल कला आणि विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात खुलेआम कॉप्या सुरू होत्या. या गैरप्रकारांसाठी हे कॉलेज कुप्रसिद्ध आहे. म्हणूनच जळगाव, औरंगाबादसह मुंबई आणि पुणे येथील विद्यार्थी इथे प्रवेश घेतात, अशी माहितीही समाेर आली. मंगळवारी हिंदी विषयाचा पेपर सुरू असताना परीक्षार्थी बिनधास्तपणे गाइड, कॉप्या समाेर ठेवून पेपर लिहीत होते. पर्यवेक्षक, शिक्षकही त्यांना सहकार्य करत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत दिसून आले.
बाेर्डाकडे जाणार अहवाल
हा गैरप्रकार “दिव्य मराठी’ने ६ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केला. त्याची दखल घेत सिल्लोडचे गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार यांना चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गुरुवारी लाेहार महाविद्यालयात जाऊन चौकशी करतील व अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करतील. त्यानंतर हा अहवाल बाेर्डाकडे सादर केला जाईल, असे देशमुख म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.