आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM शिंदेंचे ठाकरेंवर टीकास्त्र:दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे सहकारी होऊ; आम्हाला बुडबुडे म्हणणाऱ्यांची धुलाई केली

पैठण22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम-याकूब मेमन यांचे हस्तक होण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी होऊ. देशद्रोही लोकांचे आम्ही हस्तक नाही, आम्हाला बोलायला लावू नका. आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांची आम्ही त्याच साबणाने धुलाई केली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.

रोहयोमंत्री असलेल्या संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर शिंदे दुपारी चिकलठाणा विमानतळावर आले. त्यानंतर त्यांनी पैठणकडे प्रयाण केले. या वेळी बिडकीन येथे त्यांनी नागरिकांकडून सत्कार स्वीकारला. सायंकाळी शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तानाजी सावंत, दीपक केसरकर, उदय सामंत, अतुल सावे यांच्यासह संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, शंभूराज देसाई , संजय राठोड, अब्दुल सत्तार, दादाजी भुसे, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती.

शिंदे म्हणाले, बाळासाहेबांची खरी सेना कोणती हे आजच्या विराट सभेतून दिसत आहे. ही माणसे प्रेमाने आली आहेत, पैशाने नाही. ही गर्दी सच्च्या शिवसेनेची आहे, आम्ही घेतलेल्या निर्णयाला पसंती देणारी ही गर्दी आहे. भुमरेंची लोकप्रियता या गर्दीतून दिसत आहे. अभिनेता सलमान याचा चित्रपटातील डॉयलाग मारत “जे होणार तेच बोलतो, जो शब्द दिला तो दिला, त्यानंतर मी स्वत:चे पण ऐकत नाही,’ असे सांगत त्यांनी विरोधकांना इशाराही दिला. दरम्यान, पैठणमध्ये १०० खाटांचे रुग्णालय आणि संत ज्ञानेश्वर उद्यानाचा लवकरच विकास करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

आता जनता खुश : अडीच वर्षांचा वनवास संपला. राज्यातील नागरिक निराश होते. आता लोक खुश आहेत. एवढे लोक पैसे घेऊन येतात का, असा सवालही त्यांनी विरोधकांना केला. “आम्ही जेथे जातो तेथे कॅमेरा घेऊन जात नाही. माझ्याकडे लाेक स्वत: येऊन फोटो काढतात. कारण मी त्यांच्यातील आहे,’ असेही ते म्हणाले.

त्यांच्या खोक्याचा हिशेब काढत नाही : मुख्यमंत्री म्हणाले, जे कधी करायला नको होते ते त्यांनी केले. त्यांच्या खोक्यांचा हिशोब मी आज काढत नाही. मतदार आणि हिंदुत्वाशी प्रतारणा, विश्वासघात कुणी केला हे त्यांना माहीत आहे. हे राज्य सामान्यांचे आहे. या राज्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना नुकसानीसाठी भरघोस निधी देत आहोत. त्यांनी मुंबईसाठी काय केले? निवडणुका आल्या की त्यांना मराठी माणसाचा पुळका येतो, अशी टीकाही शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

सभेच्या आधी पैसे देऊन गर्दी जमवल्याची क्लिप व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यात दोन कार्यकर्ते सभेसाठी येणाऱ्या लोकांना २५० रुपयांऐवजी ३०० रुपये देण्याबाबत बोलत होते. यावरूनही विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची पेढेतुला करण्यात आली. त्यानंतर पेढे घेण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

बाहेरून लाेक आणले : खैरे

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दम नव्हता. सभेची स्पाॅन्सरशिप भाजपची होती. शिंदे टेन्शन आणि प्रेशरमध्ये बोलताना दिसले. या सभेसाठी पैठण तालुक्यातील मोजकेच लोक होते. ही सभा पैठण तालुक्याची नव्हती तर, नगर, परभणी, जालन्याचे लोकच जास्त होते, अशी टीका सेना नेते चंद्रकांत खैरेंनी केली.

सकाळी ६ पर्यंत कामे करतो

आधी अजित पवार टीका करत होते, आता सुप्रिया सुळे पण सुरू झाल्या. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ. मी सकाळी ६ पर्यंत लोकांची कामे करतोय, यात खंड पडणार नाही. शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, त्यांच्या रोड शोमध्ये राष्ट्रवादीचे लोक होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना मंत्री संदिपान भुमरे हे सभा संपेपर्यंत उभे होते. पवार, सुप्रियांनी आपले घर पाहावे आम्ही पन्नास लोक सर्वांना पुरून उरलो. अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपले स्वत:चे घर पाहावे. अजित पवार यांना दिल्लीत बोलू दिले नाही. सुप्रिया सुळे यांच्या “राज्याला दोन मुख्यमंत्री असावेत,’ या टीकेवर शिंदे म्हणाले, मागे २ मुख्यमंत्री होतेच, त्यामुळे त्यांना असे वाटत असावे.

बातम्या आणखी आहेत...