आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेदांता समूह आणि तैवानी कंपनी फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मितीचा १७४ हजार कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरातमधील ढोलेरा औद्योगिक वसाहतीत उभारण्याचा निर्णय कंपनीने घेतला. खरे तर एक लाख रोजगार देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याची खूप चर्चा होती. तत्कालीन ठाकरे सरकार व विद्यमान शिंदे सरकारनेही त्यासाठी प्रयत्नही केले. मात्र गुजरातने सेमीकंडक्टर निर्मितीसाठी विशेष धोरण मंजूर करून वेदांताला आकर्षित करण्यात बाजी मारली. महाराष्ट्रातील प्रकल्प पळवून नेण्याच्या आरोपावरून राजकीय आरोप- प्रत्यारोपही झाले. मात्र ढोलेरोची निवड का केली? या प्रश्नाचे उत्तर स्वत: वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनीच दिले. ‘दिव्य भास्कर’चे डी.डी. वैष्णव यांनी त्यांच्याशी केलेली विशेष बातचीत.
प्रश्न : देशासाठी सेमीकंडक्टर चिप महत्त्वाची का आहे?
अग्रवाल : ही नव्या युगाची गरज आहे. छोट्या मोबाइल फोनपासून ते मोठ्या जहाजापर्यंत सर्व काही बनवण्यात या चिपची भूमिका महत्त्वाची ठरते. सद्य:स्थितीत सेमीकंडक्टर चिप उत्पादनात अमेरिकेचा वाटा १२ टक्के तर चीन-तैवान सारख्या देशांचा वाटा तब्बल ८० टक्के आहे. विचार करा, जर चीनने सेमीकंडक्टरचा पुरवठा बंद केला तर जगात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन अक्षरश: ठप्प होईल. कोरोनाकाळात चीनची पुरवठा साखळी तुटली तेव्हा आपण हा अनुभव घेतला आहेच.
भारतात निर्मितीमुळे काय बदलेल?
अग्रवाल : खूप काही. जसे तेल व्यवसायामुळे आखाती देशांचे जग बदलले, तसेच सेमी कंडक्टर उत्पादनामुळे भारताची अर्थव्यवस्था बदलून जाईल. भारतात त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. २०२६ पर्यंत ३००
अब्ज डॉलर किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी ७० ते ८० अब्ज डॉलर
किमतीचे सेमीकंडक्टरची गरज लागेल. सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्लिंग आणि टेस्टिंगमध्ये भारत सक्षम होईल.
गुजरातकडून विशेष पॅकेज मिळाले का?
अग्रवाल : गुजरात सरकारने दहा वर्षांसाठी प्रतियुनिट दोन रुपये दराने वीज देण्याची हमी दिली आहे. गुजरात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी अॅक्ट, १९५८ अंतर्गत ड्यूटी पेमेंटमध्ये सूट मिळणार आहे. अजून काही अनुदानेही मिळाली आहेत. राज्य सरकारच्या औद्योगिक धोरणामुळे हे सर्व सोपे झाले आहे.
प्रश्न : प्रकल्प प्रत्यक्षात कधी सुरू हाेईल?
अग्रवाल : केंद्र सरकारकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. ती मिळताच आम्ही भूमिपूजन करू. भूमिपूजनानंतर ३० महिन्यांत उत्पादन सुरू होईल. सेमीकंडक्टर प्रकल्प दोन टप्प्यात उभारला जाईल.
प्रश्न: गुजरातला काय फायदा होणार?
अग्रवाल : या चिपनिर्मिती प्रकल्पातून सुमारे एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शेकडो एमएसएमई निर्माण होतील. जगाच्या नकाशावर गुजरातच्या ढोलेराला सिलिकॉन व्हॅलीचा मान मिळणार आहे.
सेमीकंडक्टर प्लँट उभारल्यामुळे भारताचा काय फायदा होणार आहे?
अग्रवाल : सेमीकंडक्टर उत्पादनातील ८०% बाजारपेठ चीनसारख्या देशांनी व्यापलेली
आहे. जरा विचार करा, चीनने हा पुरवठा बंद केला तर काय होईल? सारे जग थांबेल. ते आपण कोरोनामध्ये पाहिले आहे. भारतातील या प्लँटमुळे चीनचे वर्चस्व संपेल.
चिपनिर्मितीत आम्ही भारताला तिसऱ्यावरून पहिल्या क्रमांकावर आणू : अग्रवाल
प्रकल्प महाराष्ट्रात का सुरू केला नाही, या प्रश्नावर अग्रवाल म्हणाले, आम्ही विविध पर्यायांचा विचार करत होतो, पण अखेर ढोलेराची निवड केली. खरे तर कोणत्याही उद्योगासाठी सप्लाय चेन (पुरवठा साखळी) आवश्यक असते. ढोलेरा हा देशातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकासाचा एक भाग आहे. या ठिकाणी कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. कार्गो सुविधेसाठी अहमदाबाद- वडोदरा विमानतळ, पिपावाव, मुंद्रा, कांडला, भावनगर बंदरही इथून जवळच आहे. ढोलेरा रस्ते मार्गाने पश्चिम फ्रंट कॉरिडॉरच्या अगदी जवळ आहे. ढोलेरा-अहमदाबाद द्रुतगती मार्गही आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. या सर्व सुविधा महत्त्वाच्या ठरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.