आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वबळाचा नारा देत असताना उद्धव ठाकरे यांच्या मविआने एकत्र लढण्याच्या आवाहनाबाबत काँग्रेसमधील दुसरा गट अनुकूल आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी ‘दिव्य मराठी'चे नागपूर प्रतिनिधी अतुल पेठकर यांनी साधलेला संवाद...
प्रश्न : १९६० ते ७० देशात काँग्रेस पाॅवरफुल होती. तेव्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद का नाही सोडवला?
चव्हाण : एका राज्यात एक सरकार आल्याने हा प्रश्न सुटेल असे नाही. शिवाय महाजन आयोगाने दिलेला निवाडा महाराष्ट्र सरकारला मान्य नाही. २००४ मध्ये राज्याने सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर तारखांवर तारखा पडत राहिल्या. २०१४ मध्ये कर्नाटकने प्रतिदावा दाखल केला की सर्वोच्च न्यायालयाला राज्यांच्या सीमा ठरवण्याबद्दल सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. हा अधिकार फक्त संसदेला आहे. आता मूळ दावा सुटल्याशिवाय सीमावादाची सुनावणी घेता येणार नाही. कर्नाटक या प्रश्नी चालढकल करीत आहे.
प्रश्न : भाजप कधी एमआयएम तर कधी आपला काँग्रेसविरोधात वापरत आहे. महाराष्ट्रात काय चित्र असेल?
चव्हाण : महाराष्ट्रात आप काँग्रेसचा पर्याय होऊ शकत नाही. २०१४ ते २०१९ मध्ये काँग्रेसला १९ टक्क्यांपेक्षा जास्त मते आहेत. आपचे प्रस्थ फार वाढेल असे वाटत नाही. एमआयएमचाही फारसा प्रभाव पडणार नाही.
प्रश्न : काँग्रेस राज्यात क्रमांक एकवर येण्यासाठी काय करता येईल?
चव्हाण : त्यासाठी राहुल गांधींनी प्रदेेशाध्यक्षांना नेमले आहे. त्याला आम्ही काय करू शकतो? एक मात्र खरे आहे की, माझी मते योग्य ठिकाणी मांडेन.
प्रश्न : स्थानिक निवडणुकांचे काय?
चव्हाण : निवडणुका झाल्या पाहिजेत. त्यात महाविकास आघाडीचा प्रयत्न चालला आहे. अशी आघाडी झाली तर काँग्रेस निवडून येईल. अन्यथा तर काँग्रेसचा पराभव अटळ आहे. एकटे लढायला काही अवघड नाही. पण यश येणार नाही...
प्रश्न : राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा कितपत फायदा होईल?
चव्हाण: फायदा नक्कीच होईल. सध्या फील गुड वातावरण आहे. राहुल गांधींची विश्वसनीयता वाढली आहे. काँग्रेसने यात्रेचा टेम्पो वाढवायला पाहिजे. पण, ईडीच्या केसेसमुळे सर्व जण बेजार झाले आहेत.
प्रश्न : तुम्ही पक्षातील काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती. नव्या अध्यक्षांनी त्यात काही बदल केले असे वाटते का?
चव्हाण: अजून तरी नाही केलेे. खरगेंना आम्ही निवडून आणले, तर त्यांना काही वेळ द्यावा लागेल.
प्रश्न : वैदर्भीय जनतेमध्ये अधिवेशन होऊ नये अशी भावना का वाढीस लागत आहे?
चव्हाण: सर्व पोरकटपणा चालला आहे. तीन आठवड्यांच्या अधिवेशनाचे वचन पाळले पाहिजे. हिवाळी अधिवेशनाचा काहीही उपयोग होताना दिसत नाही हे खरे आहे.
प्रश्न : सीमा प्रश्न आताच निर्माण झाला असे वातावरण निर्माण होत आहे अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्यावर काय मत?
चव्हाण : महाविकास आघाडीच्या ताब्यात सर्वोच्च न्यायालय नाही. कर्नाटक सरकार वेगवेगळे मुद्दे मांडून चालढकल करीत आहे. त्यांना खटला चालविण्यात इंटरेस्ट नाही. सीमा प्रश्न दोन राज्यांनी बसून सोडवायचा आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्रश्न सुटला पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.