आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारे यांची मुलाखत:माझ्या प्रश्नांनी भाजप घाबरलाय, शिंदे गट बिथरलाय; पण यात्रा थांबणार नाही

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या महाप्रबोधन यात्रेमुळे भाजपचे द्वेषमूलक राजकारण व फडणवीसांची कुटिल नीती उघड होत असल्याने आपल्या सभांना परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. ‘दिव्य मराठी' च्या विशेष प्रतिनिधी दीप्ती राऊत यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न : तुमच्या महाप्रबोधन यात्रेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप आहे.
अंधारे :
माझ्या सभेत किंवा भाषणात एकही असंवैधानिक शब्द वापरलेला नाहीये. मी फक्त लोकांच्या मनातील, त्यांना भेडसावणारे महागाई, बेरोजगारीचे प्रश्न शासनाला विचारत आहे. प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. महाप्रबोधन यात्रेतून आम्ही संतांचा, संविधानाचा विचार मांडत आहोत.

प्रश्न : मग, तुमच्या सभांना परवानगी का नाकारली जात आहे?
अंधारे :
मुक्ताईनगरला जेथे आमची महाप्रबोधन यात्रेची सभा होती त्या मैदानावर महाआरती ठेवण्यात आली. तेथे आसपास कोणतेही मंदिर नाही. या साऱ्यामागचे राजकारण लोकांना आता समजू लागले आहे. यात्रेतून आम्ही भाजपचे द्वेषमूलक राजकारण सोप्या शब्दांत लोकांच्या लक्षात आणून देत आहोत. यामुळे भाजप घाबरला, शिंदे गट बिथरला आहे. शिवसेना फोडणे, सरकार पाडण्यामागे फडणवीस होते. हा कुटिल डाव उघड पडत आहे. त्यांच्या प्रतिमेला, विश्वासार्हतेला तडा जात आहे, म्हणून माझ्यावर सभाबंदी आणून माझा आवाज बंद करण्याची भाजपची राजकीय खेळी आहे. पण आम्ही या बंदीने थांबणार नाही, अटक करा, गुन्हे दाखल करा, मी थांबणार नाही. ही यात्रा सुरूच राहाणार.

प्रश्न : नारायण राणे यांना शिवसेनेच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांचा अपमान केला म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते का?
अंधारे :
भाषणात कुणाचा अवमान, उपमर्द झाल्यास कारवाईची कायदेशीर तरतूद आहे. माझ्या भाषणात मी कुणाचा अपमान करत नाहीये, बेकायदेशीर बोलत नाहीये. मी ज्यांना प्रश्न विचारते त्यांचा उल्लेख सन्मानाने करते. माझी भाषणे तपासून बघावीत.

प्रश्न : तुम्ही संविधानाचा विचार मांडता आणि संविधानात सांगितलेले धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व व शिवसेना ज्या तत्त्वावर उभी आहे तो हिंदुत्वाचा विचार परस्परविरोधी आहे...
अंधारे :
नाही, परस्परविरोधी नाहीये. अन्य जाती-धर्मांचा द्वेष म्हणजे हिंदुत्व हा भाजपनेे द्वेषमूलक प्रचार केला आहे. हिंदुत्व सर्व धर्मांची आधारशिला आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेत ते मांडले आहे.

प्रश्न : आपण स्वत : बौद्ध धर्म मानता...
अंधारे
: म्हणून मी हिंदू धर्माबद्दल बोलायचे नाही असे नाही. मला बुद्धाची करुणा समजते, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानते. बाबासाहेबांचे संविधान समजते. संत तुकारामाचा गाथा माझ्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. मला संत रोहिदासांचा विचार महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे माझे वर्गीकरण केलं जाऊ नये. माणूस म्हणून मूल्य मान्य केले जावे.

प्रश्न : भिडे गुरुजींनी टिकलीवरून महिलांचा अपमान केलाय...
अंधारे
: कुणी काय नेसावे, कसे राहावे हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. भाजपच्याच द्वेषमूलक राजकारणाचा हा परिणाम आहे. हिंदुत्व म्हणजे इतर धर्मांबद्दल तिरस्कार, अतिरंजित विचार हा गैरसमज पसरवला जातो आणि त्याला भिडे आणि तुषार भोसलेसारखे लोक खतपाणी घालतात, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे.

शिरसाटांचे मंगल चिंतते.. प्रश्न : तुमचे भाऊ शिरसाट म्हणताहेत ते नाराज नाहीत...
अंधारे
: संभाजीनगरमधील अब्दुल सत्तारांच्या सभेला तेथीलच दुसरे आमदार असलेले संजय शिरसाट जाणार नाहीत, ही नाराजी नाही तर काय? असो. माझ्या भावाची इच्छा असेल की मी बोलून त्यांना अडचणीत आणू नये तर मी नाही बोलणार. मी त्यांच्या मांगल्याचा विचार करते आणि त्यांना शुभेच्छा देते की, लवकरच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होवो.

बातम्या आणखी आहेत...