आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाथषष्टी यात्रा उत्सव काळात पैठण येथे राज्य भरातून भाविक येतात. यंदा 15 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व विभागांनी भाविकांना तत्पर सेवा देण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि यात्रा उत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले.
पंढरपुर प्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्टी सोहळ्याच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देणार असल्याचेही भूमरे यांनी यावेळी सांगितले. पैठण येथे साजऱ्या होणाऱ्या नाथषष्टी यात्रा उत्सवाबाबत विविध विभागाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, प्रभारी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, तहसीलदार शंकर लाड, नाथमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, विश्वस्त विठ्ठल महाराज चनघटे आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीतून निधी देणार
पालकमंत्री म्हणाले, भाविकांची येणारी संख्या पाहता शहरात तात्पुरते बसस्थानक उभारण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, आरोग्य सुविधा तत्पर ठेवावी तसेच भाविकांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, भाविकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी आताच नियोजन करावे, शहर सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही भूमरे यांनी सागितले.
या बैठकीत एसटी वाहतुक सुविधा, आरोग्य विभाग पुर्व तयारी, नाथषष्टी काळात जायकवाडी धरणातुन गोदापात्रात सोडण्यात येणारे पाणी, गोदावरी वाळवंटातील साफसफाई, बीएसएनएल दुरसंचार सेवा, नगर पालिका पाणी पुरवठा व्यवस्था, नाथ मंदिर ट्रस्ट कडुन भाविकांसाठी सोयी सुविधा, पोलिस बंदोबस्त, जीवन प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येणारी कामे, पैठण शहरात विद्युतीकरण सजावट व्यवस्था आदी भौतिक सोयी सुविधा देण्याबाबत आढावा घेण्यात आला. नाथषष्टी यात्रेसाठी पुर्व तयारीची करण्यात येणारी सर्व कामे प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सरकारी यंत्रणेच्या संबधित अधिकारी व कर्मचारी, प्रतिनिधींनी विचारलेल्या तयारीची माहीती देतांना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.