आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डीचा विकास होणार:महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे निमंत्रित सदस्य जाहीर; मराठवाड्यातील 6 जणांना मिळाली संधी

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना योग्य व्यासपीठ आणि इतर सुविधा मिळत नसल्याने ते मागे पडतात. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींना संघटनेवर स्थान दिल्याने मराठवाड्यातील कबड्डीच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने निमंत्रित सदस्य जाहीर करुन या खेळात मराठवाड्यातील 6 जणांना संधी मिळाली आहे.

मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यातून स्विकृत सदस्य म्हणून विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांची तर निमंत्रित सदस्य म्हणून औरंगाबादचे डॉ. माणिक राठोड, हिंगोलीचे डॉ. नवनाथ लोखंडे, परभणीचे डॉ. माधव शेजुळ, लातूरचे शंकर बुड्ढे, जालन्याच्या मनीषा पायगव्हाणे-काटकर यांची राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी नुतन सदस्यांना नियुक्ती पत्र दिले.

सेवा करण्याची संधी

आपला खेळाडू जिल्ह्याचेच नव्हे तर राज्य आणि देशाचे नाव उंचावतो. खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या, त्यांना मदत केली, तर पर्यायाने ते एकप्रकारे राज्याची, देशाची सेवा केल्यासारखेच आहे. राजकीय व सरकारच्या माध्यमातून कबड्डी खेळाचे संवर्धन करण्यासाठी तसेच खेळाडूंच्या विकासासाठी ज्या काही गोष्टीची मदत लागेल, ती करण्यास मी सदैव तत्पर व प्रयत्नशील राहिल, अशी प्रतिक्रिया नुतन सदस्य आमदार अंबादास दानवे यांनी दिली.

राज्यात 100 मैदाने बनवणार

वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात आजघडीला 50 कबड्डीचे मैदान तयार करण्यात आले आहे. राज्यात 132 मैदाने तयार करण्याचा मानस असल्याचे नूतन सदस्य मनीषा पायगव्हाणे-काटकर यांनी सांगितले. या मैदानांवर जवळपास 600 खेळाडू मोफत सराव करतात. मुलांना प्रशिक्षणासाठी कोच देखील उपलब्ध करून दिले आहेत. गत वर्षी भव्य-दिव्य राज्यस्तरीय स्पर्धा घेऊन खेळाडूंसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. यापुढेही देणार आहेत, असे काटकर म्हणाल्या.

वसुंधरा फाउंडेशनच्या कबड्डी व्हिलेजेस् “कणका पॅटर्न “चा प्रसार व प्रसार सर्व महाराष्ट्रभर करायचा मानस आहे. ग्रामीण भागातील आपल्या कबड्डी खेळातील गुणवत्ता कशा प्रकारे सुधारीत होईल, खेळाचे मैदाने व त्या अनुशंगाने योग्य मार्गदर्शन, तसेच खेळातील ग्लॅमर कसे पुढे आणता येईल, या अनुशंगाने प्रयत्न सुरु आहेत, असे ही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...