आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलवर जुगार:रोज 40 कोटींचा सट्टा, औरंगाबाद शहरात सहा प्रमुख ठिकाणी कोट्यवधींची देवाण-घेवाण

औरंगाबाद / सुमीत डोळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) क्रिकेटप्रेमी लोक घरात बसून टीव्हीवर आनंद लुटतात, तर दुसरीकडे शेकडो लोकांना दररोजच्या मॅचवर सट्टा लावण्यास प्रोत्साहन देऊन काही बुकी खोऱ्याने पैसे कमावत आहेत. औरंगाबाद शहरातही या बुकींचे जाळे पसरलेले आहे. सध्या शाळा-महाविद्यालये बंद असल्याने अल्पवयीन मुले-तरुण या ‘व्यसना’कडे आकर्षित झाले आहेत. एकट्या औरंगाबाद शहरातून राेज आयपीएलवर तब्बल ४० ते ४५ कोटी रुपयांचा सट्टा लावला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे सट्टेबाजांची संख्या वाढल्याने आता शहरातील सहा मध्यवर्ती ठिकाणी पैशाची देवाण-घेवाण सुरू असते. पाेलिस व गुन्हे शाखेला मात्र हे रॅकेट अजूनही उद‌्ध्वस्त करता आलेले नाही.

दरवर्षी औरंगाबादमध्ये आयपीएल सामन्यांदरम्यान सट्टा खेळवणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असते. यंदा मात्र शहर पोलिस, गुन्हे शाखेने त्यांच्याकडे साफ दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. या व्यवहारात हायटेक फंड्यांचा वापर केला जाताे. सट्टेबाजांकडून फाेनवरून बुकिंग घेण्याएेवजी ‘अॅप’सारख्या यंत्रणेचा वापर करून ऑनलाइन व्यवहार सर्रास केले जात आहेत. प्रमुख बुकींच्या माध्यमातून त्यांचे एजंट शहरभर हे रॅकेट चालवत असल्याची माहिती आहे.

सूत्रधारांबाबत पाेलिस अनभिज्ञ
सट्ट्याचे ऑनलाइन प्रमाण शहरात वाढले. काही दिवसांपासून अवैध गॅस रिफिलिंंग, बायो डिझेल, जुगार, दारू विक्री व हॉटेलवर छाप्यासारख्या किरकोळ कारवायांमध्येच व्यग्र असलेले पोलिस ठाणे, गुन्हे शाखेला मात्र दिवसाढवळ्या चाललेल्या सट्ट्याच्या दलदलीविषयी काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सिटी चौक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ऑनलाइन आयडीद्वारे खेळणाऱ्या सहा जणांना अटक केली हाेती, मात्र या खेळाचे खरे सूत्रधार पाेलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत.

चार प्रमुख सेशनवर खेळला जातो हायटेक सट्टा
1.
एकूण २० ओव्हरचे बुकीजकडून चार सेशन पाडले जातात. यात पहिला १ ते ६ ओव्हर पॉवर प्ले, दुसरा ६ ते १० ओव्हर, तिसरा १० ते १५ आणि शेवटचा टप्पा १५ ते २० आेव्हरचा.

2. एका संघाच्या एकूण धावसंख्येच्या आकड्यावरच थेट बोली लावण्याला ‘लंबी’ असे म्हणतात. शहरातून सर्वाधिक बोली ‘लंबी’वरच लावली जात असल्याचे एका बुकीने सांगितले.

3. प्रत्येक बॉल, विकेट, प्रत्येक स्वतंत्र खेळाडू, बॉलवरदेखील सट्टा लावला जातो. मात्र, त्याचे प्रमाण यंदा तुलनेने कमी आहे. सर्वाधिक कमाई हाेत असल्याने ‘लंबी’मध्येच जास्त रस दिसताे.

दर दोन दिवसाला सीमकार्ड बदल
- औरंगाबादेत लहान नवे बुकीज आहेत. त्यात पाच टॉप बुकीज स्वतंत्र सट्टा चालवतात. फर्निचर, लॉटरी, राजकारण क्षेत्राशी संबंधित हे लोक आहेत. यात एमजे, आरजे, पीटी, एके, एमडी अशा कोडवर्डने या टॉपच्या सट्टेबाजांना ओळखले जाते. यापैकी काही जण यापूर्वीदेखील पोलिसांच्या तावडीत सापडलेले आहेत.

- चिकलठाणा, निराला बाजार, गुलमंडी, वाळूज, टीव्ही सेंटर या मुख्य ठिकाणी बुकींचे एजंट रोख पैशाची देवाण-घेवाण करतात. खेळणाऱ्यांची संख्या वाढल्याने यंदा काही ठरावीक परिसराचे नाव कॉलवर सांगताच त्या एजंटच्या नावाने तो सट्टा, बुकिंग घेतली जाते. उदा. ‘भाऊ, मुंबई लंबीवर दहा लावा, मुकुंदनगर’ एवढेच सांगताच कॉलवरील बुकीज उर्वरित बुकिंग करून घेतो.

- लॉटरी, बार, हॉटेलमधून लाखो रुपयांचे रोखीचे व्यवहार चालतात. कोटींच्या घरात आकडा गेल्यास ताे व्यवहार हवालामार्फत हाेताे, तर बुकीज मात्र शहराबाहेर जाऊन बसतात. उदा. बीडचे बुकीज औरंगाबाद, तर औरंगाबादचे बडे मासे अहमदनगरमध्ये जाऊन बसले आहेत. त्याशिवाय शहरात तरुण वर्ग हॉटेलमध्ये खोल्या घेऊन किंवा जवळपासच्या निर्जनस्थळी जाऊन मॅच होईपर्यंत सट्टा खेळत असतात.

- सर्व व्यवहार विश्वासावर चालतात. बुकिंगसाठी येणारा प्रत्येक काॅल बुकीजकडून रेकॉर्ड केला जातो. हे रॅकेट चालवणारे पहिल्या स्तरापासून ते शेवटच्या स्तरापर्यंतचे सर्व बुकीज व त्यांचे एजंट दर दोन दिवसाला सीम कार्ड बदलतात.

- दुबईत आयपीएल सुरू असल्याने बुकीजला ‘वरून’ मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला गेला. शेकडो आयडी तयार झाले. त्यानंतर खेळणाऱ्याला आयडी देऊन पासवर्ड सेट करताच तो पुढे खेळू शकतो. कमीत कमी दहा हजार रुपये असतील तरच त्याला गांभीर्याने घेतले जाते. त्यापेक्षा कमी रकमेला या व्यवहारात फारसे महत्त्व दिले जात नाही.

- या ‘व्यसना’पायी अनेक तरुण कर्जबाजारी होत आहेत. मग परिसरातील भाऊ-दादाकडून टक्केवारीवर उसने पैसे घेऊन सट्टा खेळला जाताे. सामन्यात अचानक आश्चर्यकारकरीत्या बदल होतो आणि कर्जबाजारी हाेणाऱ्या सट्टेबाजांचे प्रमाण वाढत जाते. यातूनच आयपीएल संपल्यानंतर तरुणांच्या आत्महत्या वाढण्याचादेखील धोका संभावताे.

शनिवारच्या सामन्यांचा रेट
बुकींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबई-दिल्लीचा सामना झाला. त्यात पहिल्या सेशनपर्यंत (सहा ओव्हर) ४५ रन ते ४६ रनवर सट्टा लागला. १० ओव्हरपर्यंत ७३/७४, तर लंबीसाठी १६२/१६३ लागला होता. यात वेबसाइटवर ७.६ मंुबईसाठी, तर ७.९ दिल्लीसाठी लागला होता. हा दर बुकीच्या मनानुसार आलटीपलटीसुद्धा होऊ शकतो.

पैशाच्या लालसेने अल्पवयीन, सामान्य तरुणही विळख्यात
पूर्वी सट्टा खेळणाऱ्या बुकींनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादला अनेक वर्षांपासून सट्ट्याचे व्यवहार चालतात. यंदा काॅलेज, शाळा बंद असल्याने घराेघरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परिणामी लहान मुलांच्या व तरुणांच्या हातातही माेबाइल असतात. त्यातून काही जण कमी वेळेत पैसे कमावण्याची साधने शाेधतात. काहींना शेअर मार्केटचे, तर काहींना आयपीएल सट्ट्याचा नाद लागला. यावर्षी औरंगाबादसह मराठवाड्यातून खेळणाऱ्यांची संख्या वाढली. यात १४ -१५ वर्षांची मुलेदेखील सट्टा लावत असल्याचे दिसते.

खाया आणि लगाया हे मूळ कोडवर्ड असून शनिवारी दिल्लीसाठी ‘खाया’, तर मुंबईसाठी ‘लगाया’ हा काेडवर्ड वापरला होता.

बातम्या आणखी आहेत...