आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पासाठी प्रयत्न:कायम दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या वॉटर ग्रीड प्रकल्‍पासाठी इस्रायलचे महाराष्‍ट्राच्‍या राज्यपालांना साकडे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी आखण्यात आलेली महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रीड योजना नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागे पडली. या याेजनेचा खरेच कितपत फायदा होऊ शकताे याची खातरजमा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. यामुळे कोरोनाकाळात जवळपास बासनात गुंडाळल्या गेलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता इस्रायली अधिकारीच सरसावले असून त्यांनी हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे, अशी विनंती थेट राज्यपालांकडे केली आहे.

मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायलमधील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी आराखडा तयार करत आहे. काेराेनाकाळात लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे,अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे केली. इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज सध्या भारत भेटीवर आहेत. त्यांनी गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी व राजकीय सल्लागार अनय जोगळेकर उपस्थित होते. त्यावर इस्रायलचा जलव्यवस्थापन प्रकल्प मराठवाड्यासाठी निश्चितच वरदान ठरेल, असे राज्यपाल म्हणाले.

सूक्ष्म जलव्यवस्थापनासाठी इस्रायल प्रसिद्ध आहे. या देशात ८५ टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यामुळे आज आपला देश पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर जॉर्डनलाही पाणी निर्यात करत असल्याचे राफाएल हर्पाज यांनी राज्यपालांना सांगितले. मोदी इस्रायलला भेट देणारे पहिलेच पंतप्रधान असून इस्रायलचे पंतप्रधानही यावर्षी भारतभेटीवर येणार असल्याचे हर्पाज म्हणाले.

कर्करोग संयंत्रामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के : इस्रायलने अलीकडेच मुंबई येथील टाटा स्मृती रुग्णालयाला कर्करोग उपचारासाठी अद्ययावत मशीन दिली असून या संयंत्रामुळे शस्त्रक्रिया न करता कर्करोग बरा करता येतो, अशी माहिती वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी या वेळी दिली. या मशीनच्या यशस्वीतेचे प्रमाण ९८% आहे.रुग्णांनी कर्करोग निदानासाठी लवकर आल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...