आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शन (सील) कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय एकात्मता यात्रा तीन दिवस औरंगाबाद शहरात होती. या यात्रेच्या माध्यमातून आमच्या घरात राहिलेल्या विद्यार्थ्यांमुळे आम्हाला तीन दिवसांत आमच्या घरात संपूर्ण भारत राहण्यासाठी आला असे वाटले, अशी भावना यजमान कुटुंबाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
तीन दिवसांसाठी ईशान्य भारतातून आलेले विद्यार्थी स्थानिक यजमान कुटुंबात सामावून घेण्यात आले होते. यानिमित्त या कुटुंबाचे तसेच ईशान्य भारतातून आलेल्या ३० विद्यार्थ्यांचे नागरी स्वागत सोमवारी (६ फेब्रुवारी) करण्यात आले. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी अभाविपचे क्षेत्रीय सहसंघटनमंत्री रायसिंह, उद्योजक राम भोगले, स्वागताध्यक्ष संजीव तांबोळकर, स्वागत सचिव मनीष पाटील, महानगर अध्यक्षा डॉ. योगिता पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय एकात्मता यात्रेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबात सहभागी करून घेणाऱ्या यजमान कुटुंबांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विशाला शर्मा म्हणाल्या, ‘या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाच्या संस्कृतीचे आदान-प्रदान करण्याचे काम होते. आम्ही आमच्या कुटुंबात सहभागी झालेल्या मुलींना रांगोळी शिकवली. भाषा येत नसल्यामुळे आम्ही गुगल ट्रान्सलेटरचा आधार घेतला. तीन दिवसांत असे वाटले की संपूर्ण भारत देश आमच्या घरी राहिला.’
अमांसो तथांग या अरुणाचल प्रदेशमधील मिस्मी या जमातीमधील विद्यार्थ्यानेही मनोगत व्यक्त केले. अमांसोने ‘कसे आहात?’ हे या यात्रेदरम्यान शिकलेले मराठी शब्द उच्चारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. रायसिंह यांनी उत्तरपूर्व भागातील सीलच्या कामाबद्दल माहिती दिली. वन पीपल, वन नेशन आणि वन कल्चरबद्दल बोलताना त्यांनी उत्तरपूर्व भारतातील सातही राज्यांतील नागरिक प्रामाणिक असल्याची टिप्पणी केली.
डॉ. कराड, भुमरे आणि सावेंची पाठ राष्ट्रीय एकात्मता यात्रेच्या नागरी स्वागत समारंभासाठी क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. स्वागत समितीमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, प्रदीप जैस्वाल तसेच संजय शिरसाट यांची पत्रिकेमध्ये नावे होती. मात्र, या मान्यवरांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.