आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा महाविकास आघाडीवर निशाणा:ठाकरे सरकार पडणार हे निश्चित; केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचा दावा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार पायउतार होणार हे निश्चित झाले आहे. हिंदुत्व सोडल्याचा परिणाम ह्या सरकारला भोगावा लागत आहे. कॉग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याने काय होते याचे चित्र आता स्पष्ट व्हायला लागले आहे. दीर्घ काळ कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत राहिलो तर पुन्हा निवडूण येणार नाही याची खात्री पटल्यानंतर संबंधित चाळीस आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. आपण मुंबईत दाखल झालो असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. आता शंभर टक्के महाविकास आघाडी सरकार पडणार यात तिळमात्र शंका नाही.

राज्यात शिवसेनेचे आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडाचे निशान फडकवत राज्याबाहेर गेलेले असताना भाजपने मात्र आपल्या आमदारांना अद्याप मोकळेच ठेवले आहे. भाजपच्या आमदारांना अद्याप एकत्र जमण्याच्या सूचना नाहीत. भाजप आमदारांनी आपल्या मतदारसंघात थांबावे. राज्याबाहेर जाऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास भाजप आमदार यांनी वेळेत मुंबईला पोहचावे यासाठी राज्याबाहेर जाऊ नयेत अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याचे जिल्ह्यातील भाजप आमदार यांनी सांगितले.

दिव्यमराठीच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप आमदारांचा कानोसा घेतला असता तिनही आमदार पक्षाने सांगितलेल्या बाबींवर लक्ष ठेवून असल्याचे निदर्शनास आले. राज्याचे माजी मंत्री तथा औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे शहरात आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. आ. सावे म्हणाले अद्याप मुंबईला पाचारण करण्यात आलेले नाही. आपण मतदारसंघात आहोत, केवळ राज्याबाहेर जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पक्षाचा आदेश मिळताच काही तासातच मुंबईला पोहोचणे शक्य होईल अशा ठिकाणी असणे अपेक्षित आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब तिसऱ्यांदा आमदार असून योगायोगाने मुंबईत असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यास आनंद होईल असे त्यांनी सांगितले. आपणास मंत्रीपद नकोय परंतु आपल्या मतदारसंघातील थांबलेला विकास पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. सर्वच मंत्री बनू शकत नाहीत आपल्याला मर्यादा माहिती आहेत.

परंतु रखडलेले प्रकल्प मार्गी लागले तरी त्यात आपणास आनंद आहे. भाजप पक्ष देऊल ती जबाबदारी स्विकारण्यास आपण नेहमीच तत्पर असतो असेही आ. बंब यांनी सांगितले. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आ. हरिभाऊ बागडे यांनी पक्षाकडून अद्याप काहीच सूचना आल्या नसल्याचे सांगितले. आपण मतदारसंघातील गणोरी या गावात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याबाहेर जाऊ नये अशा सूचना असल्याचे त्यांनी सांगितले.