आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवलेखक सृजनशील आहेत. माध्यमांचा वापर करून ते अधिकाधिक जणांपर्यंत वेगाने पोहचतात. पण, फक्त साहित्य संमेलन घेऊन जबाबदारी संपणार नाही, तर नवमाध्यमांचा अचूक वापर करत जुन्या लेखक-विचारवंतांचे साहित्य सर्वांपर्यंत पोहोचवणे ही खरी जबाबदारी आहे, असे मत ख्यातनाम शायर हसन कमाल यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
प्रगतिशील लेखक संघातर्फे आयोजित अकरावे अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन शनिवारी सुरू झाले, या वेळी हसन बोलत होते. पंजाब-हरियाणा साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुखदेवसिंग सिरसा, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. इक्बाल मिन्ने, राम बाहेती, तानाजी ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगार मीरा पवार यांनी ‘सर्जनाकडून श्रमाकडे’ असा संदेश देत मशाल पेटवली.
महाराष्ट्राने उर्दूला आपलेसे केले : महाराष्ट्राने मात्र उर्दूला आश्रय दिला. राज्यात साडेचार हजार उर्दू शाळा आणि महाविद्यालये आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात उर्दूचे इतर कुठेही संवर्धन केले गेले नाही. यामुळेच महाराष्ट्राबद्दलचा विशेष आदर आहे, अशा शब्दांत हसन यांनी उर्दू आणि महाराष्ट्राबद्दल भावना व्यक्त केली.
पंजाब आणि महाराष्ट्रात साधर्म्य... ‘भक्ती चळवळ आणि रणबहादुरांची भूमी, हे पंजाब, महाराष्ट्रातील साधर्म्य आहे. तलवार-लेखणी दोन्ही प्रांतांत तळपते. संत नामदेवांनी सुरू केलेली परंपरा आजच्या काळातही अबाधित आहे. आधुनिक साहित्यापर्यंतचे वाचन पंजाबात केले जाते,’ असे सुखदेवसिंग सिरसा म्हणाले.
जागर स्मरणिकेचे प्रकाशन
या वेळी ‘जागर’ स्मरणिका, भगवान राऊत संपादित ‘आम्ही घडलो’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले आणि राकेश वानखेडे यांनी आभार मानले. संमेलनात रविवारी मुलाखत, व्याख्यान, परिसंवाद आणि कविसंमेलन होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.