आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिन्मय, संजीवनी, विनीतचा असा झाला अभिनयाचा प्रवास सुरु:म्हणाले - गणेशोत्सवातूनच अभिनयाची चुणूक दाखवण्याचा श्रीगणेशा झाला!

वैशाली करोले | औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत वाढलेले हिंदी कलाकार असोत वा मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमधील अभिनेते असोत, सोसायटीतला गणपती, गल्लीतलं गणेश मंडळ हाच अनेकांसाठी स्वत:तील कलेची जाणीव करून देणारा, सादरीकरणाची संधी देणारा उत्सव. कलेची देवता हे बाप्पाचं नाव यांचे अनुभव सार्थ ठरवतात. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने यातीलच काही आघाडीच्या कलाकारांनी "दिव्य मराठी'साठी दिलेला हा आठवणींचा उजाळा.

  • गणेशोत्सवातील नाटक हीच अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात : चिन्मय उदगीरकर

"माझी सुरुवातच मुळात गणेशोत्सवापासून झाली. तेव्हा मी चौथीत होतो. गणेशोत्सवामध्ये आमच्या सोसायटीतील एक काकांनी 'बंडूचा अभ्यास' नावाचे नाटक लिहिले होते. त्यातल्या बंडू पात्रासाठी त्यांनी माझी निवड केली होती. कारण लहानपणी मी खूपच खोड्या करायचो. शाळेच्या अभ्यासात मी चांगला होतो, पण शिक्षकांना त्रास खूप द्यायचो. आमच्या कारवारनगरमध्येही मी खूप खोड्या करायचो. खिडक्यांचा काचा फोडायचो. गाड्यांची हवा पंक्चर करायचो. म्हणून काकांनी बंडू म्हणून मला निवडले. गणेशोत्सवात आम्ही बंडूचा अभ्यास हे नाटक केले. त्याची खूप प्रशंसा झाली. माझ्या कामाची प्रशंसा झाली. मग मला कळले, की जे लोक मला रागवतात, ते तर माझे कौतुक करतात. तेव्हाच मला कळले की आपल्याला अभिनय करता येतो. त्यानंतरच मी नाटक करायचे ठरवले. अभिनय मग पॅशन झाला आणि आता तेच माझे प्रोफेशन झाले आहे. पुढे नंतर गणेशोत्सवात सादरीकरणाची संधी मिळाली नाही, पण पुढे मी बालनाट्यात भरपूर काम केले."

यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करणार याविषयी बोलताना चिन्मय सांगतो, "दरवर्षी मी आमचा नाशिक मानाचा गणपती राजा रविवार कारंजाच्या गणपतीला दर्शनाला आवर्जुन जात असतो. यावर्षीही तिथे दर्शनाला जाणार आहे. शिवाय दरवर्षी माझ्या घरी तीन दिवस बाप्पा पाहुणचाराला येत असतो. त्यामुळे ते तीन दिवस मी हक्काची सुटी घेऊन घरीच थांबतो. आम्ही घरी शाडूच्या मातीची मुर्ती आणतो आणि संपूर्ण सजावट स्वतः करतो. अशाप्रकारे गणशोत्सव साजरा करतो."

  • सहावी-सातवीत असताना गणपतीच्या स्पर्धेतच पहिल्यांदा एकपात्री केले होते : विनीत भोंडे

​​​​​​​"आम्ही 1996 मध्ये औरंगाबादच्या खडकेश्वर या भागात राहायला गेलो. तिथे आमच्या कॉलनीतील लोकांनी सार्वजनिक गणपती बसवायचा निर्णय घेतला. तेव्हा मी सहावी-सातवीत असेल. तेव्हा आमच्या गणेशोत्सव मंडळात वत्कृत्व स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा, फॅन्सी ड्रेस आणि एकपात्री प्रयोग अशा अनेक स्पर्धा होऊ लागल्या. तिथे मी पहिल्यांदा परफॉर्म केले. तिथे मला एकपात्री प्रयोग करण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी मला पहिले पारितोषिकदेखील मिळाले. तिथे मला पहिल्यांदा समजले की, मी लोकांना हसवू शकतो. विशेष म्हणजे तिथे माझ्या सादरीकरणाला वन्स मोअर मिळाले. याआधी मी शाळेत फक्त इतरांना पारितोषिक घेताना पाहिले होते. त्यावेळी आपल्याला कोण पारितोषिक देणार, आपल्याला काय येतं, असे मला वाटायचे. त्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड माझ्यात निर्माण झाला होता. पण 1996 च्या गणेशोत्सवादरम्यान मी डेअरिंग करुन परफॉर्म केले आणि पारितोषिक पटकावले. त्यानंतर हळूहळू माझा आत्मविश्वास वाढू लागला. शाळेतील ऑफ पिरिएडमध्ये मी विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करु लागलो. असा माझा हळूहळू प्रवास सुरु झाला. गणेशोत्सवानंतर मला शाळेतील गॅदरिंगमध्ये सादरीकरणाची संधी मला मिळू लागली. पुढे मला बालनाट्यात काम करण्याची संधी मिळाली. पण या सगळ्याची पायाभरणी ही गणेशोत्सवातूनच झाली असे मी म्हणेल. माझ्या आयुष्याचा, करिअरचा श्रीगणेशा हा गणपतीतच दडलेला आहे असे म्हणायला हरकत नाही. दहावी आणि बारावी हे दोनच वर्षे मी कुठे सादरीकरण केले नाही. पुढे 2003 पासून माझा अभिनयाचा प्रवास हा आजतागायत सुरु आहे."

पुढे बोलताना विनीत सांगतो, "मी आजपर्यंत जे काही घडलोय ते गणपतीच्या इच्छेमुळेच घडलोय. माझ्या मुलाचा जन्मही गणेश चर्तुर्थीच्या दिवशी झालेला आहे. त्यामुळे मी त्याला गणपतीने दिलेला मोदक म्हणतो. मुलाच्या जन्मापासून मी चतुर्थीचा उपवास ठेवतोय. आता माझा मुलगा सहा महिन्यांचा आहे. त्याच्या जन्मानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आमच्यासाठी खूपच खास आहे. आमच्या घरी आम्ही शाडूच्या मातीची मुर्ती आणतो. संपूर्ण सजावट कुटुंबीय एकत्र मिळून करतो. आणि घरीच बाप्पाचे विसजर्न करतो."

  • गणेशोत्सवातील अभिनयानेच मिळवून दिले ‘वस्त्रहरण’चे 4995 प्रयोग : संजीवनी जाधव

मी वयाच्या 13 व्या वर्षी परळच्या मैदानात “चला आळंदीला जाऊ” या नाटकातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. या नाटकाच्या वेळेलाच कुणीतरी प्रेक्षकांमध्ये उंदीर सोडल्याची अफवा उठवली. यामुळे पळापळ सुरू झाली आणि आंधळी भूमिका साकारणारी मी डोळसपणे पाहू लागले. यामुळे कोपऱ्यातली छोटी छोटी मुलं ओरडू लागली, ‘अरे ते बघ ती आंधळी होती, आता पटकन बघायला लागली.’ त्यामुळे एकच हशा पिकला. या नाटकानंतर मी अनेक वर्षे गणेशोत्सवातील नाटकांत काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी मच्छिंद्र कांबळी यांचे वस्त्रहरण हे नाटक मिळाले. त्याच्या 4995 प्रयोगांत मी ठसठशीत भूमिका साकारली. गणेशोत्सवामुळे मला रंगमंच मिळाला. (शब्दांकन : अश्विनी तडवळकर)

बातम्या आणखी आहेत...