आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न व औषध प्रशासन:दिवाळीत तुम्ही खाल्लेल्या मिठाईत भेसळ होती का, हे दोन महिन्यांनंतर कळणार

औरंगाबाद / संतोष देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत घरोघरी मिठाई, खाद्यपदार्थ, खाद्यतेल, तूप आदींची खरेदी केली गेली. त्याचा दर्जा, गुणवत्ता हे सर्व पदार्थ खाल्ल्यानंतर दोन महिन्यांनी कळणार आहे. म्हणजेच प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल दोन महिन्यांनी अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त होईल. त्यानंतर पुढे भेसळयुक्त उत्पादक, विक्रेत्यांवर कारवाई हाेईल. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, तेल आदी खाद्यपदार्थ विक्री होतात. यापासून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे भेसळीवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अचानक मोहीम राबवून दुकानातील मिठाई, खाद्यतेल आदी खाद्यपदार्थांची तपासणी केली जाते. नमुने घेतले जातात. पुढे याचे काय होते, अहवाल कधी मिळायला हवा व कधी मिळतो, कारवाई काय होते याबाबत दिव्य मराठी प्रतिनिधीने जाणून घेतले. शहर जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवले आहेत. मात्र, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नियमाप्रमाणे चौदा दिवसांत अहवाल मिळायला हवा. प्रत्यक्षात प्रयोगशाळांची संख्या कमी व मनुष्यबळाचा अभाव असल्याने विलंबाने अहवाल मिळतो. तसेच कारवाईलादेखील उशीर होताे. दिवाळीत खाल्लेल्या मिठाई, खाद्यपदार्थांची गुणवत्ता उशिराने कळते. त्याचा फारसा उपयोग होत नाही.

दिवाळीत लाखाेंचा भेसळयुक्त साठा जप्त : शहर अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त अजित मैत्रे व ग्रामीण सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी, संजय चट्टे, सुलक्षणा जाधवर, वर्षा रोडे, ज्योत्स्ना जाधव, मेघा फाळके, नमुना सहायक श्रीराम टापरे आणि काशीनाथ तुपे यांनी सणासुदीच्या काळात तपासणी मोहीम राबवून खवा व पनीरचा १ लाख २८ हजार ८०० रुपये, खाद्यतेल १० लाख ३० हजार ७४४, तुपाचा ३ लाख ५६ हजार ४१६ आणि मसाल्यांचा १ लाख ७५ हजार ३८० रुपये किमतीचा साठा जप्त केला.

विलंबामुळे भेसळीला प्रोत्साहन : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना थेट सवाल दिवाळीत किती दुकानांवर तपासण्या केल्या आहेत, नमुने गोळा केलेॽ उत्तर : विविध दुकानांतून ४३ तपासण्या करून अन्नपदार्थांचे ८३ नमुने घेतले. प्र. नमुने कोणत्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेॽ उत्तर : प्रयोगशाळांची नावे देता येणार नाहीत. प्र. प्रयोगशाळेत आपण पाठवलेल्या नमुन्यावर काय प्रक्रिया होते. वेळेत अहवाल मिळतात काॽ उत्तर : प्रयोगशाळेत नमुने चाचणीत विश्लेषण होते. भेसळ आहे किंवा नाही याबाबत तज्ज्ञ सूक्ष्म अभ्यास करून अहवाल देतात. १४ दिवसांत तो मिळणे आवश्यक असते. प्रत्यक्षात जास्त कालावधी लागतो. प्र. विलंब का होतो, त्वरित अहवाल मिळावा यासाठी काय करायला हवेॽ उत्तर : प्रयोगशाळा कमी आहेत. मनुष्यबळही कमी असते. त्या तुलनेत नमुने जास्त असतात. परिणामी उशीर होताे. त्यामुळे प्रयोगशाळा वाढवून पुरेसे मनुष्यबळही भरणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाला कळवले जाईल. प्र. ग्राहकांना तत्काळ सेवा कशी मिळेलॽ उत्तर : ग्राहकांना भेसळसंदर्भात तपासणी करायची असेल तर ते स्वत: प्रयोगशाळेत नमुने पाठवून अहवाल प्राप्त करू शकतात. तसेच शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. त्याची त्वरित दखल घेतली जाते.

बातम्या आणखी आहेत...