आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:माझे डोनाल्ड ट्रॅम्प यांच्याशी बोलणे झालेय, चेक घ्या आणि 70 हजार कोटी लगेच द्या!

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनॉट परिसरातील खासगी बँकेत येत एका तरुणाने थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ देत पैसे काढण्यासाठी ७० हजार कोटींचा धनादेश दिला. मी शास्त्रज्ञ असून नासाचा प्रतिनिधी आहे, मला लगेच हे पैसे द्या, असे म्हणत ठाण मांडून बसला. मग बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला कसेबसे पोलिस ठाण्यात पाठवले. पोलिसांनी त्याला शांत करत त्याचे नाव, कुटुंब आणि इतर माहिती घेतली. त्याच्या भावाने तो मानसिक रुग्ण असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी या तरुणाला त्यांच्या ताब्यात दिले. पण या प्रकारामुळे बँकेत आणि ठाण्यात दोन्ही ठिकाणी बराच वेळ गोंधळ सुरू होता.

सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता बँकेत आलेल्या, सिडको एन-८मधील रहिवासी सचिनने ७० हजार कोटींचा आकडा टाकलेला धनादेश कॅश काऊंटरला दिला. धुळीने माखलेल्या धनादेशावरील आकडा पाहून हादरलेल्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, सचिन म्हणाला की, मी नासासाठी पृथ्वीच्या संरक्षणाचे काम करतो. नासाने त्यासाठी पैसे दिले आहेत. माझे अमेरिकेचे ट्रम्प यांच्याशी बोलणे झाले आहे. अधिकारी समजूत घालू लागले. तेव्हा तो अधिक आक्रमक झाला. मग, अधिकाऱ्यांनी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्याशी संपर्क साधला. गस्तीवरील पोलिस कर्मचारी विशाल सोनवणे, किशोर गाडे बँकेत येऊन सचिन पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथेही त्याने आधीचेच पालुपद कायम ठेवले. मग गिरी यांनी त्याला “तुमचे सर्व पैसे मिळवून देतो’ असे म्हणत शांत केले. बोलण्याच्या ओघात त्याचे नाव, कुटुंब, घराची माहिती काढून घेतली. नंतर त्याच्या भावाशी संपर्क साधला. सचिन मानसिकदृष्ट्या आजारी असून त्याचे कुटुंबही त्याला सोडून गेले आहे. पदव्युत्तर पदवी घेतलेल्या सचिनला त्याचा भाऊच सांभाळतो हे कळल्यावर पोलिसांनी त्याला भावाच्या सुपूर्द केले.

बातम्या आणखी आहेत...