आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुलंब्रीच्या पाल येथील एचएसजे स्टेडियमवर सुरू असलेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेत जाधव इलेव्हन संघाने विजय मिळवला. रविवारी झालेल्या सामन्यात जाधवने जय हिंद संघावर २ गडी राखून मात केली. या लढतीत शतकवीर सोनू काटकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जय हिंद संघाने ४३.५ षटकांत सर्वबाद २८३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात जाधव इलेव्हन संघाने ३६ षटकांत ८ गडी गमावत २८६ धावा करत विजय साकारला. यात सलामीवीर रितेश वाहुळकरने ३८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा काढल्या. यशराज पवार ७ व गगनजित सोनवणे (०) आल्यापावली परतले. त्यानंतर आलेल्या सोनू काटकरने नाबाद शतक ठोकले. सोनूने ८७ चेंडूंचा सामना करताना १६ सणसणीत चौकार व ६ उत्तुंग षटकार खेचत नाबाद १३१ धावांची विजयी खेळी केली. अंकुश पचहरणेने २४ चेंडूंत फटकेबाजी करत २ चौकार व ४ षटकार खेचत ४२ धावा ठोकल्या. मनीने ११ धावा केल्या. आदित्य वाघने १९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. जय हिंदकडून नयन वाणीने ६४ धावांत ३ गडी बाद केले. रोहन पंडित व सुरज वाघने प्रत्येकी दोन दोन गडी टिपले.
दर्श पांडेचे शतक हुकले
तत्पूर्वी, जय हिंदची सुरुवात खराब झाली. सलामीवीर समर्थ पुरी १, नयन वाणी ३, स्वराज जाधव ३, सोहन देशमुख (०) अपयशी ठरले. झैद खानने १२, हर्ष मुळेने २१ धावा केल्या. दर्श पांडेचे शतक हुकले. दर्शने ६२ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह ९५ धावा ठोकल्या. रोहन पंडितने २८ धावा केल्या. जाधवकडून आकाश पाचहारणेने ४, यशराज पवारने ३ आणि महेश राठोडने २ गडी बाद केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.