आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची कासवगती:जाधववाडी टी पॉइंट पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात; ग्रीन बेल्ट बनवण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव रोडवरील जळगाव टी पॉइंट सिडकोपर्यंत दोन्ही बाजूंनी सबवे बनवण्याचे तसेच ग्रीन बेल्ट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु मनपा प्रशासन कासवगतीने काम करत असल्याने जाधववाडी टी पॉइंटवर ग्रीन बेल्ट व सबवेवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे जाधववाडी टी पॉइंट येथील राजे संभाजी कॉलनीवासीयांना पायी चालणे अवघड झाले आहे. अनेक वाहनधारक सबवे नसल्याने राँग वेने वाहने नेत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे तसेच सबवे तयार करून ग्रीनबेल्ट विकसित करण्यात यावा, अशी मागणी संभाजी कॉलनी परिसरातील नागरिक करत आहेत.

शहरात विकासकामे करण्यात येत असल्याचा दावा मनपा प्रशासन करत आहे. जळगाव टी पाॅइंट सिडकोपर्यंत मुख्य रस्त्यालगत असलेले सबवे तसेच ग्रीनबेल्ट विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु जाधववाडी टी पॉइंंट सबवे आणि ग्रीन बेल्टवर अतिक्रमण झाले आहे. ते काढण्याची तत्परता मनपा दाखवताना दिसत नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अतिक्रमण काढा, रस्ता मोकळा करा
जाधववाडी टी पॉइंट संभाजी कॉलनी परिसरात सबवे तसेच ग्रीन बेल्टवर अतिक्रमण झाले आहे. आमच्या परिसरातील अतिक्रमण मात्र तसेच आहे. ते काढून रस्ता मोकळा करावा. - रवी गायके, रहिवासी, राजे संभाजी कॉलनी

शालेय विद्यार्थ्यांना त्रास
सबवे तसेच ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण झाल्याने वाहने राँगसाइडने येतात. त्यामुळे सेंट जॉन, ड्रीमलँड शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. - निवृत्ती वहाटुळे, रहिवासी

अतिक्रमणधारकांवर कारवाई करू
स्थळपाहणी करून अतिक्रमणे काढण्यात येतील. रस्ता मोकळा करून देण्यात येईल तसेच वेळ पडल्यास अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येईल. - सविता सोनवणे, मनपा पदनिर्देशित अधिकारी

रस्त्यावरून चालणे कठीण
अतिक्रमित दुकानांच्या मागे नशेखोर आणि टवाळखोर उभे राहतात, तेथे लघुशंका करतात. त्यामुळे महिलांना रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. - सुनीता आग्रे, रहिवासी

नशेखोरांचा संचार वाढला
अतिक्रमित जागेवर भंगार तसेच विविध टपऱ्या आहेत. त्यामुळे नशेखोरांचा मुक्त संचार वाढला आहे. संध्याकाळी मोठा त्रास सहन करावा लागतो. - विजयमाला तांगडे, रहिवासी

बातम्या आणखी आहेत...