आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय हुकूमशाही पद्धतीने घेण्यात आला आहे. हा निर्णय लोकभावनेच्या विरोधात झाला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामांतर संघर्ष समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
जलील म्हणाले, ‘केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेखातर या शहराचे नाव कसे काय बदलले जाऊ शकते? अनेक जण औरंगाबाद या नावासाठी पाठिंबा असल्याची पत्रे देत आहेत. मात्र मी त्यांना इथे येऊन औरंगाबादच्या नावासाठी सहभागी व्हा असे आवाहन केले आहे. औरंगाबादच्या सर्वधर्मीय लोकांना औरंगाबाद हेच नाव हवे आहे. केवळ भीतीपोटी काही लोक प्रतिक्रिया देत नाहीत.’
...तर कौल मान्य असेल नामांतराच्या मुद्द्यावर जनमत चाचणी घ्या. लोकांनी चाचणीत छत्रपती संभाजीनगर असा कौल दिला तर तो आम्हाला मान्य असेल. मात्र, हुकूमशाही पद्धतीने नामांतर होऊ देणार नाही, असे जलील यांनी स्पष्ट केले.
निर्णय कोर्टात टिकणार नाही : अॅड. फारुकी छत्रपती संभाजीनगर | देशभरातील विविध राज्यांमध्ये शहरांची नावे बदलण्याचा त्या त्या राज्यांकडून सुरू असणारा खटाटोप आणि त्यातून बिघडत चाललेला सामाजिक सलोखा यासंदर्भात भारतीय राज्य घटनेच्या कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयास एखाद्या मुद्द्यावर स्वत:हून दखल घेण्याचा अधिकार आहे, असे सांगत अॅड. उमर फारुकी यांनी ६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाकडे ‘सुमोटो’ हस्तक्षेप करण्याची विनंती करण्याबाबत अर्ज दिला आहे. हा निर्णय न्यायालयात टिकणार नाही, असे मत अॅड. फारुकी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे छत्रपती संभाजीनगर | राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि तो सर्वांना समान न्याय देईल, अशी आमची भावना होती. मात्र, शहराच्या नामांतराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही समर्थन आहे, अशी आमची भावना झाली अाहे. त्यामुळे आम्ही ५० पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. खान म्हणाले,‘ फक्त सत्तेच्या लोभापायी राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराच्या ठरावाला सहमती दिली. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेवर नाराज होऊन आम्ही राजीनामा देत आहोत.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.