आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापितळी तांब्या, लिंबू, चार नारळ, हळद-कुंकू लावून, एक नऊ फुटी खड्डा खोदून गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले, तर तिघे पळून गेल्याची ही घटना बदनापूर शहरातील कुंभार गल्ली येथील गुलजार मशिदीजवळील एका पडक्या वाड्यात मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली.
कुंभार गल्ली येथील गुलजार मशिदीच्या शेजारी फिरोज पठाण यांच्या पडीक वाड्यामध्ये काही लोक मंत्रोच्चार करून जादूटोणा करत गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करत असल्याबाबतची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. या ठिकाणी धर्मदास गोपाल दास (पारोड, पालघर), विजय फुलचंद सहाने (मिनार, ता. भिवंडी), उत्तम विठ्ठल दाभाडे (धोपटेश्वर, ता. बदनापूर) जावेद खान महेबूब खान, साजिद खान महेबूब खान (गुलजार मशिदीजवळ, बदनापूर), फिरोज पठाण मोईनोद्दीन पठाण (हुसेननगर, बदनापूर) हे सर्वजण आढळून आले.
यातील धर्मदास दास व विजय सहाने हे पितळी तांब्या, चार नारळ, हळद-कुंकू लावलेले एक लिंबू व एक लालसर रंगाचे कापड अंथरूण जादूटोणा करत मंत्रोच्चार करत होते. इतर जण दोन लोखंडी फावडे, दोन टिकाव व दोन प्लास्टिकच्या टोपल्याद्वारे खड्डे खोदत होते. पहाटे २.३० च्या सुमारास गुप्त धनाच्या लालसेने हे काम करत असल्यामुळे पोलिस कर्मचारी सय्यद अफसर सय्यद अजगर हुसेन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन मांत्रिकांसह एक असे तीन जण ताब्यात घेण्यात आले आहेत. तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील या तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.