आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात पाच जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पाऊस झाला. जून महिन्यात मान्सूनचा चांगला पाऊस होत आहे. जालना जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरणीला गती मिळाली आहे. जालना जिल्ह्यात १ ते १७ जून या कालावधीत जवळपास १०५.७५ मिमी पावसाची नोंद झाली. जालना तालुक्यात १७ जून रोजी २९.८ मिमी पावसाची नोंद येथील कृषी विज्ञान केंद्रात झाली. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात मृग नक्षत्रापूर्वीच ५० मिमी पाऊस झाला.
मृगानंतर ७ तसेच ९ जूनदरम्यान विविध ठिकाणी पाऊस झाला. त्यानंतर जिल्ह्यात ६ ते ७ दिवस पावसाने दडी मारली. बुधवार, गुरुवारी मात्र पावसाचा तुटवडा भरून निघाला. यात परतूर तालुक्यात तब्बल १४८ मिमी, अंबडमध्ये २४३ मिमी, जाफराबाद तालुक्यात ४५ मिमी पाऊस झाला. यंदा आजपर्यंत १०५.७५ तर मागील वर्षी १२७.७५ मिमी पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर जालना, भोकरदन, मंठा आणि परतूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
नदीतून १२ किमीपर्यंतची शोधमोहीम निष्फळ
बुधवारी सायंकाळी पिंपळगाव रेणुकाई परिसरात जोरदार पाऊस झाल्याने भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील नदीला पूर आला होता. पुरातील पाण्यातून सलीम सय्यद व शाहेद सय्यद पायी जात होते तेव्हा शाहेद पाण्यात वाहून गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी अवघडराव सावंगी पुलावर घडली.
गुरुवारी सकाळपासूनच ग्रामस्थ तसेच नातेवाईक, महसूल, ग्रामपंचायत व अग्निशमन दलातील बचाव पथकाने पुरात बेपत्ता झालेल्या तरुणाचा नदीच्या काठाने तब्बल १२ किमीपर्यंत २६ तास कसून शोध घेतला. परंतु, रात्री उशिरापर्यंत बेपत्ता शाहेद सापडला नाही. दरम्यान, शोधमोहीम करीत असताना अधूनमधून पाऊस होत असल्याने तपास मार्गात अडथळे निर्माण होत होत आहेत. गुरुवारी रात्र झाल्याने सर्वांनी शोधमोहीम थांबवली होती.
परभणी : मागील २४ तासांत १३ मिमी पाऊस
गेल्या २४ तासांत सरासरी १३ मिमी पाऊस झाला. परभणी शहरात दुपारी ३ च्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दुपारपर्यंत शहरात ढगाळ वातावरण हाेते. दुपारी दोननंतर वातावरणात बदल हाेऊन परभणी, गंगाखेड, पूर्णा, सोनपेठ तालुक्यात २४ तासांत दमदार पाऊस झाला. परभणी तालुक्यात २४.४ मिमी, गंगाखेड १७.२, पाथरी ११, जिंतूर २.३, पूर्णा १७.९ पालम ११.७, सेलू ६.९, सोनपेठ १८.८, मानवतमध्ये ५.८ मिमी पाऊस झाला.
नांदेड : कापूस, साेयाबीन, हळद लागवड सुरू : नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत गुरुवारी मध्यम ते हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून कापूस, सोयाबीन, हळद लागवड करण्यात येत आहे. बुधवारी नदीत वाहून गेलेला तरुण २६ तासांनंतरही सापडेना
हिंगोली : जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी
हिंगोली शहरासह जिल्हाभरात गुरुवारी दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सेनगाव, वसमत तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे पेरण्यांनी वेग घेतला असून आतापर्यंत ८ ते १० टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५६.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मागील २४ तासांत हिंगोलीत ८, कळमनुरी ५.४०, सेनगाव १, वसमत १.५०, औंढा नागनाथ तालुक्यात ७.८० मिमी पावसाची नोंद झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.