आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमाड येथील रेल्वेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे प्लॅटफॉर्म रिकामा मिळत नसल्याची री पुन्हा मध्य रेल्वे मुंबईने ओढली. त्यामुळे आता मराठवाड्यातील भक्तांना शिर्डीपर्यंत स्वस्तात घेऊन जाणारी जालना-श्रीसाईनगर शिर्डी डेमू शटल विनाआरक्षित रेल्वे रद्द करावी लागली. आता आठवड्यात तीन वेगवेगळ्या दिवशी शनिवार वगळता डेमू शटल केवळ नगरसोलपर्यंतच धावणार आहे.
प्रवाशांना झळ
डेमू शटलचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे नमनालाच सोमवारी (ता. 20) सकाळी धावण्यापूर्वीच दक्षिण मध्य रेल्वेच्या हद्दीपर्यंत नगरसोल जाणार असल्याने नियोजित वेळापत्रक रद्द करण्याची वेळ आली. मध्य रेल्वे मुंबईकडून अशा प्रकारे आडकाठी आणण्याचे काम सुरू असून प्रतिदिन आठशेंवर प्रवाशांना याची झळ सोसावी लागेल.
डेमूच्या मार्गात काटे
जालना-नगरसोल डेमू शटल सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वे मुंबईकडून डिझेल भरण्यासाठी परवानगी नाकारल्यामुळे संबंधित गाडीला प्रवाशांसाठी जेवढा प्रवास करावा लागायचा त्यापेक्षा दुप्पट प्रवास डिझेल भरण्यासाठी करावा लागत होता. मनमाड येथे केवळ 14 कि.मी. ऐवजी 350 कि.मी. जालना येथे पोहचल्यावर डिझेलसाठी पूर्णा येथे 350 कि. मी. ये-जा करावी लागत होती. धुलाईसाठी मौलाअली सिकंदराबाद येथे जावे लागत होते.
मध्य रेल्वेची आडकाठी
'दिव्यमराठी'ने यासंबंधी वाचा फोडल्यानंतर मध्ये रेल्वे मुंबईने डिझेल भरण्याची परवानगी दिली होती. आता पुन्हा मनमाड येथे प्लॅटफॉर्मवर जागा नसल्याचे कारण पुढे करीत जालना नगरसोल डेमूचा विस्तार शिर्डीपर्यंत करण्यास आडकाठी मध्य रेल्वेकडून आणली जात आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असूनही..
20 जूनपासून प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि गुरूवार शिर्डीपर्यंत नेण्याचे निश्चित केले होते. त्यासंबंधीचे वेळापत्रकही दक्षिण मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु ऐन सकाळीच रेल्वेला रेड सिग्नल मिळाल्याने द. म. रेल्वेला मध्ये रेल्वेकडून अपमानित व्हावे लागले. मराठवाड्याचे रेल्वे राज्यमंत्री असताना ज्याप्रमाणे निजामाबाद-पुणे एक्सप्रेसला हडपसरपर्यंत रोखण्यात आले तसेच दुसऱ्यांदा जालना नगरसोल डेमुला शिर्डीपर्यंत जाऊ दिले गेले नाही.
आठवड्यात तीन वेळापत्रक
जालना, बदनापूर, करमाड, चिकलठाणा, मुकुंदवाडी, औरंगाबाद, दौलताबाद, पोटुळ, लासूर, करंजगाव, परसोडा, रोटेगाव, तारूर, नगरसोल या मार्गावरून धावणारी जालना-नगरसोल डेमू शटल सोमवार, मंगळवार व गुरूवारी जालना येथून सकाळी 6.15 वाजता निघून 7.05 ला औरंगाबादला पोहोचेल आणि सकाळी 9.15 वाजता नगरसोल येथे थांबेल.
सायंकाळी 6.15 वाजता परत निघून औरंगाबादला 7.30 वाजता व जालना येथे रात्री 9.15 वा. पोहोचेल. बुधवार आणि शुक्रवारी हाच क्रम राहील परंतु रविवारी दुपारी 4.45 वाजता जालना येथून निघून दुपारी 3.45 वाजता औरंगाबाद आणि सायंकाळी 5.55 वाजता नगरसोल येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासाला नगरसोल ते जालना सायंकाळी 6.25 वाजता निघेल आणि जालना येथे रात्री 9.10 वा. पोहोचेल. शनिवारी रेल्वेला स्वच्छतेच्या कारणासाठी सुटी राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.