आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जायकवाडी धरणाचे 25 टीएमसी पाणी पळवण्याचा नाशिक जलसंपदाचा डाव

प्रवीण बह्मपूरकर | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डल्ला मारण्याचा प्रयत्न जायकवाडीत दमणगंगा नदीजोडमधून येणार होते पाणी, प्रकल्प अहवाल सादर

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी २०१९ मध्ये कोकणातून पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातील १६८ टीएमसी पाणी वळवण्याबाबत राज्य सरकारतर्फे मान्यता देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी नाशिक विभागाच्या जलसंपदा विभागाने दमणगंगा, वैतरणा, कडवा, देवनदी यासह दोन योजनांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पाणी वळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणास प्राप्त झाला. गोदावरी पाटबंधारे महामंडळाने याबबत आक्षेप घेतला आहे.

ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात एकूण मंजूर प्रकल्पाच्या जास्त पाणी वापर झालेला असूनही पाणी मराठवाड्यात वळवणे आवश्यक असल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाने कळवले आहे. पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याबाबत जलसंपदा विभागातर्फे नियोजन सुरू केले आहे. मात्र प्रत्यक्ष पाणी येण्यापूर्वीच याबाबत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली. नाशिक विभागात मान्यतेपेक्षा अधिक धरणे बांधल्यामुळे वरच्या भागात धरणे बांधण्यास उच्च न्यायालयाने आधी मनाई केलेली आहे.

मराठवाड्याच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रकार
गोदावरी खोऱ्यात पाणी वळवून मराठवाड्याची पाणीटंचाई कमी करण्याचे शासनाचे प्रयत्न नाशिक विभाग हाणून पाडत आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर २० टीएमसीपेक्षा अधिक पाण्याच्या अगोदरच योजना करून हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जात आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाडा हक्काचे पाणी मिळण्यापासून वंचित राहील. शासनाने याची गंभीरतेने दखल घेणे गरजेचे आहे. - शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ

...तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान
गोदावरी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी याबाबत नाशिकच्या जलसंपदा विभागाला पत्र पाठवले आहे. यात म्हटल्यानुसार, २३ नाव्हेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने जायकवाडीच्या वरील भागात मान्यतेपेक्षा अधिकची धरणे बांधण्यात आली असल्याने नव्याने धरणे बांधण्यास मनाई केली आहे. सद्य:स्थितीत ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात एकूण मंजूर प्रकल्पाचा पाणी वापर जास्त झाला असल्याने हे पाणी जायकवाडीतील तूट तसेच मराठवाड्यातील इतर तुटीच्या खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून वळवण्यात येत आहे.

हे पाणी जायकवाडी धरणात वळवणे आवश्यक आहे. याचा विचार करूनच आपल्या स्तरावरून सुस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाने नाशिक जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना लेखी कळवले आहे.

सिन्नरसह इतर भागासाठी वळवले जात आहे पाणी
जलतज्ज्ञ शंकरराव नागरे म्हणाले की, दमणगंगा, वैतरणा, गोदावरी (कडवा देव नदी) या नदीजोड योजनांच्या माध्यमातून दमणगंगा (वैतरणा)- गोदावरी (कडवा) उपसा योजनेअंतर्गत एकूण २०२ दलघमी (७.१३ टीएमसी) वळवणे प्रस्तावित असून यापैकी पिण्यासाठी २५.८३ दलघमी, औद्योगिक पाणी वापर ११६.७२, सिंचनासाठी ५९.७३ दलघमी पाणीवापर प्रस्तावित आहे.

तसेच सिंचनासाठीचा सिन्नर तालुक्यात ११ हजार ४८० हेक्टर प्रस्तावित आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात दमणगंगा (एकदरे) गोदावरी (वाघाड) व दमणगंगा वैतरणा गोदावरी कडवा देव नदी या माध्यमातून २५ टीएमसीवर पाणी वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...