आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन्जायकवाडी!:रात्री 11.30 वा. 27 दरवाजे उघडले; 18 दरवाजे 4 तर 9 अर्धा फुटांनी खुले; जायकवाडीतून 89 हजार क्युसेकचा विसर्ग

पैठणएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 98.62% भरले सलग तिसऱ्या वर्षी उघडली नाथसागराची कवाडे

नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेला नाथसागर (जायकवाडी) तुडुंब भरला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी या धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली. बुधवारी सकाळी वरच्या धरणसमूहातून जायकवाडीत तब्बल १ लाख ९ हजार क्युसेकने आवक सुरू हाेती. त्यामुळे सकाळी ११ वाजता धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे ४ फूट उघडून पाणी गाेदापात्रात साेडण्यात आले. रात्री ११.३० वाजता आपत्कालीन ९ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. रात्री धरणाचा पाणीसाठा ९८.६२ टक्क्यांवर पाेहाेचला. ८९ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत आवक वाढतच असल्याने रात्री उशिरा एक लाखापेक्षा जास्त क्युसेकने विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कडाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी दिली.

गाेदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. धरण भरल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार हेक्टर सिंचनाला फायदा होणार आहे. मंगळवारी जायकवाडीत उपयुक्त जलसाठा १८४६ दलघमी ८५.०४% होता, तर बुधवारी रात्री ताे ९८.६२ टक्क्यांवर (२,१३६ दलघमी) पाेहाेचला. ३६ तासांत २९० दलघमी (१३%) पाणी वाढले. सकाळी ११ वाजता तर ९४ टक्क्यांपर्यंत जलसाठा पाेहाेचला. त्यामुळे तातडीने दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी १५ अाॅगस्ट २०१९ राेजी व ४ सप्टेंबर २०२० राेजी धरणाचे दरवाजे उघडले हाेते.

मंगळवारच्या पावसाचा परिणाम : जे. एन. हिरे
सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी सांगितले, मंगळवारी जायकवाडीच्या वरील भागातील नाशिक ५३, त्र्यंबकेश्वर ९२, इगतपुरी १०९, कोपरगाव ७५, येवला १२५, वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव ७५, शिर्डी ५९, विंचूर १००, देवगाव रुही ५९, माळुंजा ९६, नागमठाण ७०, औरंगाबाद ७३, पैठण येथे ५० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आवक वाढली.

अशी वाढत गेली आवक
सोमवारी रात्री १० वाजता जायकवाडीत ७२ हजार क्युसेक आवक होती. मात्र मुसळधार पावसानंतर शिवना टाकळी प्रकल्पातून २६ हजार क्युसेक विसर्ग झाल्यामुळे बुधवारी सकाळी आठ वाजताच धरणात १ लाख २४ हजार क्युसेक इतकी आवक वाढली. १० वाजता १,२१,००० क्युसेक, ११ वाजता १,३३,०००, १२ वाजता १,१६, एक वाजता १,१४,००० तर दुपारी ३ वाजता १,२५,००० क्युसेक झाली होती.

अतिउत्साही लाेकांना राेखले
तुडुंब भरलेले जायकवाडी धरण पाहण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच लाेकांची गर्दी हाेत हाेती. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाेलिसांना गर्दी हटवण्याच्या सूचना दिल्या. पाेलिसांनी धरणाकडे जाणारे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले. कर्मचारीही तैनात केले, असे पाेलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

वरच्या धरणातून विसर्ग (क्युसेक)
दारणा- ७,०००, गंगापूर -१०,५००, नांदूर मधमेश्वर -३५,६००, भंडारदरा - ३,२००, निळवंडे -३,९००, ओझरवेअर- ५,७००, मुळा - ३,२००

जायकवाडीतून ८९ हजार क्युसेकचा विसर्ग
बुधवारी सकाळी ११ वाजता आधी जायकवाडीचे चार दरवाजे उघडून २०९६ क्युसेक विसर्ग केला. त्यानंतर १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडत विसर्ग १० हजार क्युसेकपर्यंत वाढवला. रात्री उशिरा उर्वरित ९ दरवाजे अर्धा फूट उघडून ८९ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता.

नदीकाठच्या लाेकांनी घाबरून जाऊ नये
जायकवाडीतून साेडलेले पाणी पैठणच्या नदीपात्रात १ लाख १६ हजार क्युसेकपर्यंत सामावू शकते. ढालेगावची हीच क्षमता अडीच लाख क्युसेकपर्यंत आहे. मात्र आम्ही १ लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करणार आहोत. त्यामुळे पाणी नदीपात्र साेडून बाहेर जाणार नाही, लाेकांनी घाबरू नये. - एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा

असे भरले धरण

  • २००५ ते २००९ असे पाच वर्षे धरण भरले होते
  • २००६ मध्ये २ लाख ५४ हजार क्युसेक वेगाने पाणी साेडले हाेते.
  • २०१९, २०२० आणि २०२१ मध्येही धरण भरल्याने विसर्ग.
बातम्या आणखी आहेत...