आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोर्टाचे आदेश आणि मानवसंसाधन विकास मंत्रालयाच्या, शिक्षण विभागाच्या सूचना असतांना देखील मंगळवार पासून सुरु झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत कोरोना पॉझिटव्ह असलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेपासून वंचित रहावे लागल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे.
औरंगाबाद शहरातील आयऑन डिजिटल या परीक्षा केंद्रावर कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेस बसू दिले नाही. या विद्यार्थ्यास कोणतीही लक्षण नाहीत. त्याच्यासोबत आरोग्य अधिकारी डॉ.अंजली पाथ्रीकर आणि दोन डॉक्टर सोबत होते. विद्यार्थी अगदी ठणठणीत आहे. परीक्षेला बसू शकतो. दोन दिवसात त्याला रुग्णालयातून सुटी देखील देण्यात येणार आहे. तसे केंद्रास एक दिवस आधीच कळवले होते. आधी हो म्हणणाऱ्या या केंद्राने मात्र ऐनवेळी विद्यार्थ्यास प्रवेश नाकारल्याने या विद्यार्थ्यास परीक्षेपासून वंचित रहावे लागले. या प्रकारामुळे प्रशासकीय स्तरावर असलेला समन्वयाचा अभाव देखील दिसून आला आहे.
मंगळवार दि. १ सप्टेंबर पासून अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश पूर्व जेईई मेन्स परीक्षेस सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून परीक्षा रद्द व्हावी, पुढे ढकलण्यात यावी. यावर चर्चा सुरु होती. मात्र या सर्व चर्चांना विराम देत. नियोजित वेळेतच परीक्षा होणार असा निर्णय झाला. त्यानुसार करिअर विषयी चिंता आणि कोरोनाची भिती. या सावटखाली मंगळवारी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आले. ६ सप्टेंबर पर्यंत ही परीक्षा चालणार असून, ऑनलाइन होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या पाहता दोन सत्रात पेपर घेण्यात येत आहे. सकाळीचे सत्र हे सकाळी ९ ते १२ आणि दुपारच्या सत्रातील पेपरची वेळ ही २:३० ते ५:३० अशी आहे. कोरोनामुळे आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांची थर्मल गन द्वारे तपासणी, सॅनिटायझर, मास्क या गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर जर एखादा संशयित अथवा कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी आल्यास त्याची वेगळी व्यवस्था परीक्षा केंद्रावर करावी अशा कडक सूचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु औरंगाबाद शहरातील चिकलठाणा येथे असलेल्या आयऑन डिजिटल परीक्षा केंद्रावर कोणतीही लक्षण नाहीत. परंतु कोरोना पॉझिटिव्ह असणारा एक विद्यार्थी दुपारी १ वाजता परीक्षेसाठी आली. पीपीई किट घालेले डॉक्टर, मनपा आरोग्य अधिकारी सोबत होते. त्यांनी विद्यार्थी परीक्षा देण्यास फिट असल्याचेही सांगितले. मात्र कालपर्यंत हो म्हणाऱ्या केंद्राने ऐन पेपरच्या वेळी या विद्यार्थ्यास परीक्षेस बसण्यास मज्जाव केला.
लोकप्रतिनिधी बापू घडामोडे, आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न केले तरी देखील केंद्राने त्या विद्यार्थ्यास आत घेतले नाही. जिल्हाधिकाऱ्यांना देखील फोनवर संपर्क केला असता त्यांना फोनवर प्रतिसाद दिला नाही. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये अशा कडक सूचना असतांना आणि हॉलतिकटवर असलेल्या नियमांमध्ये कोरोना रुग्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी असा उल्लेख असतांनाही विद्यार्थ्यास परीक्षेपासून वंचित रहावे लागले. माझा काय दोष असा सवाल विद्यार्थ्याने केला आहे. शहरात एकूण ४ केंद्रावर १२००० हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
दरम्यान परीक्षा केंद्रावर असलेले शासकीय परीक्षा समन्वयक अधिकारी संदीप जोगदंड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यासंबंधीची माहिती आम्ही वरती पाठवली आहे. तसेच विद्यार्थ्यास ऑनलाइन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. आमच्या हातात काहीच नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.