आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे दुर्लक्ष:‘जीवन अमृत योजना’ गुंडाळली; राज्यातील 109 कर्मचारी वाऱ्यावर

औरंगाबाद / गिरीश काळेकर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय रक्तपेढीत येणाऱ्या रुग्णांना तत्काळ रक्त पिशव्या उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचावेत, त्यासाठी आवश्यक त्या रक्तदात्यांना बोलावून रक्तदान करवून घ्यावे या उद्देशाने राज्य शासनाने शासकीय रक्तपेढीत जीवन अमृत सेवा योजना सुरू केली होती. या कामासाठी राज्यभर १०९ कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली. पण नंतर निधीच्या अभावाचे कारण देत ही योजना बंद करण्यात आली. त्यामुळे या योजनेतील सर्व कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून पाच महिन्यांपासून त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय रक्तपेढीत २०१३ पासून ब्लड ऑन कॉल (जीवन अमृत सेवा) योजना सुरू करण्यात आली होती. यासाठी प्रत्येक एक केंद्रात एक रक्त संक्रमण अधिकारी, एक वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रक्तपेढीतील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यामुळे ज्या ठिकाणी रक्तसंकलनाचे प्रमाण कमी होते, त्यात वाढ झाली होती. यातून कामकाजही सुरळीत चालू होते. मात्र या योजनेवर जास्त पैसा खर्च होत आहे असे सांगत तत्कालि शासनाने ही योजना ३१ मार्च २०२२ रोजी बंद केली. शासनाने आम्हाला सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी हनुमान रुळे, अरूण धोत्रे, शरद भडांगे, आनंद पडोरे, गणेश कानडे, सचिन दंडे, गणेश साळुंके, बंडू नरवाडे, शेखर पाटील, अनिल सोळंके, फरीद अफवारे, पल्लवी कैतकर आदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.

समायोजनाचा प्रस्ताव
पाच महिन्यांपासून बेरोजगार झालेल्या या १०९ कर्मचाऱ्यांनी शासनाकडे समायोजन करण्याची मागणी केली. यावर एक समिती गठित करण्यात आली होती. त्यांनी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत सकारात्मक अहवालही दिला. पण सरकारकडून काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्य शासन करेल सकारात्मक विचार
शासनाच्या आदेशानुसार ही योजना बंद झाली आहे. मात्र या संबंधित कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल. - डॉ. अरुण थोरात, सहायक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

खर्चाच्या कारणावरून चांगली योजना बंद
आम्ही ८ ते ९ वर्षांपासून अवरितपणे जीवन अमृत सेवा योजनेवर काम केले. रक्तपेढीतील रक्तसंकलन वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र शासनाने खर्च होत असल्याचे सांगत योजना बंद केली. आम्ही १०९ कर्मचारी बेरोजगारीला सामोरे जात आहे. शासनाने समायोजन केले पाहिजेत. - हनुमान रुळे, माजी जनसंपर्क अधिकारी शासकीय रक्तपेढी