आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती पुरस्कार:दररोज सहा तास सरावातून ज्युदोपटू श्रद्धाला आशियाई स्पर्धेत मिळाले कांस्य

वाळूज / संतोष उगले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या तिसगावच्या श्रद्धा कडुबाळ चोपडे या १७ वर्षीय ज्युदोपटूने थायलंड, बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या कॅडेट व ज्युनियर आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. शेतकरी कुटुंबातील या मुलीला ‘खेलो इंडिया खेलो’च्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ उपलब्ध झाले. त्याचे तिने सोने केले. आता येत्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा निश्चय तिने केला असून त्यासाठी भोपाळच्या खेल प्राधिकरणात प्रशिक्षण घेत आहे. अर्जुन पुरस्कारप्राप्त यशपाल सोलंकी यांच्यासह १६ कोच तिला मार्गदर्शन करत आहेत.

दोन हजार लोकसंख्येचे तिसगाव कुस्तीचे माहेरघर म्हणून मराठवाड्यात सुप्रसिद्ध आहे. त्याला ‘प्रतिकोल्हापूर’ही म्हटले जाते. या गावच्या मातीतून छत्रपती पुरस्कार, उपमहाराष्ट्र केसरी पुरस्कार तथा राष्ट्रपती पुरस्कार खेळाडू पुढे आलेले आहेत. श्रद्धाचे वडील कडुबाळ चोपडे हे स्वतः ज्युदोचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळे तिला लहानपणापासूनच मार्गदर्शन मिळत गेेले. पुढे सहावीत गेल्यानंतर तनवाणी इंग्लिश स्कूलचे शैलेश कावळे यांच्याकडून ज्युदोचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तसेच बजाजनगरातील भीमराज राहणे हेही तिला प्राथमिक धडे देऊ लागले. हे प्रशिक्षण व घरातील सरावातून श्रद्धाने बीड येथे झालेल्या सबज्युनियर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर वडिलांनी तिला मागे वळून पाहू दिले नाही. पहाटे चार वाजता उठून श्रद्धा सराव करायची. विजय धीमन, मधुश्री देसाई (पुणे) यांच्याकडूनही तिला प्रशिक्षण मिळाले. त्या जोरावर श्रद्धाने अनेक स्पर्धांत यश मिळवले.

लॉकडाऊनच्या काळात श्रद्धा घरी आली तेव्हा वडिलांनी तिला घरातच तयार केलेल्या मॅटवर प्रशिक्षण देणे सुरू केले. अंगणात व्यायाम तर घरात लहान भाऊ शंभूसोबत ती सराव करू लागली. पुण्यातून मधुश्री देसाई हे तिला ऑनलाइन प्रशिक्षण द्यायचे. याच सरावाच्या जोरावर तिने २०२१ मध्ये लेबनॉन येथील कॅडेट व ज्युनियर आशियाई स्पर्धेत यश संपादन केले. पुढे तिची निवड कॅडेट व ज्युनियर स्पर्धा सन २०२२ करिता होणाऱ्या बँकॉक, थायलंडसाठी झाली. तिथे ४८ किलो वजन गटात तिने कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्र राज्य ज्युदो तांत्रिक सचिव दत्ता आफळे, सचिव अतुल बामनोदकर, विश्वजित भावे, अजित मुळे, गणेश शेटकर, भीमराज राहणे, विजय धीमन आदींचेही श्रद्धाला मार्गदर्शन लाभले.

वारकरी कुटुंबात शाकाहाराचा संस्कार
बहुतांश खेळाडूंचा फिटनेससाठी मांसाहारावर जोर असतो. श्रद्धा मात्र त्याला अपवाद आहे. वारकरी कुटुंब असल्याने त्यांच्या घरात कुणीच मांस खात नाही. तिचे वडील ज्युदोचे राज्यस्तरीय खेळाडू असतानासुद्धा त्यांनी कधी मांसाहार केला नाही. श्रद्धानेही हेच तत्त्व पाळले. हिरव्या पालेभाज्या, दूध, दही, तूप आदींचा तिच्या आहारात समावेश असतो.

नियमितपणे पहाटे चार वाजता उठते
श्रद्धा नियमितपणे पहाटे चार वाजता उठते. ५ वाजेपासून दोन तास व्यायाम व सराव करते. त्यानंतर पुन्हा सकाळी ११ वाजता दोन तास व्यायाम व सराव करते. सायंकाळी पुन्हा ५ वाजता दोन तास सराव करते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी सरावात यापुढे वाढ करावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही प्रशिक्षण देत आहोत, असे तिचे प्रशिक्षक यशपाल सोलंकी सांगतात.

ख‌ेलो इंडियामुळे मिळाली संधी
‘खेलो इंडिया’मुळे मला देशाबाहेर खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे केंद्र सरकार, प्रशिक्षक आणि गावकऱ्यांची मी ऋणी आहे. यातून मुक्त होण्यासाठी मी ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ किंवा २०२८ मध्ये सुवर्णपदक मिळवणार आहे.
- श्रद्धा चोपडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू, ज्युदो

बातम्या आणखी आहेत...